जिल्हा रुग्णालयातील महागडी यंत्रसामग्री वापराविना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:23 IST2021-05-27T04:23:02+5:302021-05-27T04:23:02+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय कोविड हॉस्पिटल म्हणून समोर आले. त्यामुळे या ...

जिल्हा रुग्णालयातील महागडी यंत्रसामग्री वापराविना
अहमदनगर : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शासकीय कोविड हॉस्पिटल म्हणून समोर आले. त्यामुळे या रुग्णालयात इतर आजारांवर होणारे उपचार आपोआप बंद झाले. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या मधल्या काळात काही दिवस इतर आजारांवर उपचार सुरू झाले होते, मात्र पुन्हा दुसरी लाट आली आणि उपचार बंद झाले. यामुळे इतर आजारांची तपासणी करणारी यंत्र-सामग्री सध्याच्या स्थितीला वापराविना असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात विविध आजारांचे रुग्ण येत असतात. तसेच या रुग्णालयात विविध तपासण्याही केल्या जातात. त्यामुळे जवळपास २५ ते ३० विभागातील यंत्र सामुग्री सध्या वापराविना आहे. कोरोनामुळे संसर्ग होईल या भीतीने इतर आजाराचे रुग्ण येण्याची प्रमाण शून्यावर आहे. केवळ लसीकरण, कोरोना चाचण्या आणि कोरोनावर उपचार सध्या जिल्हा रुग्णालयात सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे सध्या अपघातांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे अपघात विभागातील यंत्र-सामुग्रीही वापराविना आहे. यासह विविध तापसण्या करणारे यंत्रावरही आता धूळ साचल्याची स्थिती आहे. मात्र याला जिल्हा रुग्णालय प्रशासन नव्हे तर कोरोनामुळे नाईलाजाने ती बंद ठेवावी लागत असल्याचे चित्र आहे.
-----------
हे आहेत जिल्हा रुग्णालयातील विभाग
माता व बाल संगोपन विभाग, तत्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शस्त्रक्रिया गृह, शवविच्छेदन विभाग, नवजात अर्भक काळजी कोपरा, क्ष-किरण, नेत्र तपासणी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, मोठ्या व छोट्या शस्त्रक्रिया, एकात्मिक समुपदेशन व उपचार केंद्र, पालकांकडून मुलांकडे संक्रमण प्रतिबंध उपचार केंद्र, रक्तपेढी व रक्त घटक विघटन केंद्र, फिजीओथेरेपी, अतिदक्षता विभाग, आहार विभाग
दंत विभाग, मनोविकृती विभाग, जळीत विभाग, विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष, शुश्रूषा केंद्र, ट्रौमा केअर युनिट. सोनोग्राफी तपासणी आदी.
----
खासगी रुग्णालये न परवडणारे
कोरोना व्यतिरिक्त इतर उपचार सध्या बंद आहेत. मात्र इतर आजारांचे रुग्णही तेवढेच आहेत. जिल्हा रुग्णालयात कोरोनाचे रुग्ण असल्याने इतर आजारांचे रुग्णांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात जावे लागते. तेथील उपचार त्यांना परवडत नाहीत. त्यामुळे कोरोना सुरू झाल्यापासून इतर आजारांच्या रुग्णांची परवड सुरू आहे. नियमित तपासण्या, नेत्र, शस्त्रक्रिया, दंत तपासणी, विविध आजारांवरील औषधे मोफत दिली जातात. मात्र कोरोनामुळे जिल्हा रुग्णालयात येण्यास रुग्ण घाबरत असल्याचे चित्र आहे.
--------------
जिल्हा रुग्णालयात सध्या चारशे कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सध्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. इतर आजाराचे रुग्ण येत नाहीत. तपासण्या, शस्त्रक्रिया बंद असल्याने मशिनरीचे पहिल्यासारखा वापर होत नाही, हे मात्र खरे आहे. त्यामुळे अनेक यंत्र-सामग्री वापराविना आहे. इतर मोठी यंत्रे आहेत, मात्र ती धूळखात आहेत, अशी स्थिती जिल्हा रुग्णालयात नाही. व्हेंटिलेटर सर्व कार्यान्वित आहेत.
- वैद्यकीय अधिकारी. जिल्हा रुग्णालय
------------
डमी आहे