हिवरेबाजारच्या धर्तीवर जिल्ह्यात शाळाखोल्या होणार का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:15 IST2021-06-24T04:15:32+5:302021-06-24T04:15:32+5:30

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. परंतु या शाळांच्या अनेक खोल्या जुन्या झाल्याने नवीन शाळा खोल्यांची ...

Will there be school rooms in the district on the lines of Hivrebazar? | हिवरेबाजारच्या धर्तीवर जिल्ह्यात शाळाखोल्या होणार का

हिवरेबाजारच्या धर्तीवर जिल्ह्यात शाळाखोल्या होणार का

नगर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या साडेतीन हजारांहून अधिक शाळा आहेत. परंतु या शाळांच्या अनेक खोल्या जुन्या झाल्याने नवीन शाळा खोल्यांची गरज आहे. सध्याच्या घडीला जिल्हा परिषदेला ९३० शाळा खोल्यांची गरज असून येत्या शैक्षणिक वर्षात ३१६ नवीन खोल्यांना जिल्हा परिषदेने मंजुरी दिली आहे. त्यासाठी २८ कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. एका खोलीला ८ लाख ७५ हजार रुपये खर्चाची तरतूद आहे. एवढ्या खर्चामध्ये १६ गुणिले २० अशी केवळ ३२० चौरस फुटांची व १० फूट उंचीची स्लॅबची खोली तयार होते.

परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाची स्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे झाले आहे. येत्या काही दिवसात शाळा सुरू झाल्या तरी विद्यार्थ्यांना अंतराने बसावे लागेल. या दृष्टीने सध्या मोठ्या शाळा खोल्यांची गरज भासते आहे. हिवरेबाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी दूरदृष्टी ठेवून चार वर्षांपूर्वीच त्यांच्या गावात झालेल्या जिल्हा परिषदेच्या शाळा खोल्या प्रशस्त बांधून घेतल्या आहेत. यासाठी त्यांनी काही प्रमाणात लोकसहभाग ही घेतला. हिवरेबाजारमध्ये २०१६-२०१७ मध्ये एकूण सात खोल्या जिल्हा परिषदेने मंजूर करून ३४ लाखांची तरतूद केली. परंतु पवार यांनी लोकसहभागातून आणखी १४ लाख रुपये रकमेची तरतूद करून या शाळा खोल्या मंजूर आकारापेक्षा मोठ्या आकारात बांधून घेतल्या. त्यासाठी खासगी वास्तूविशारदची मदत घेतली. त्यामुळे एक वर्ग खोली २४ गुणिले ३० अशी तब्बल ७२० चौरस फुटांची झाली. शिवाय यासाठी स्लॅबची उंची त्यांनी दहा ऐवजी बारा फूट करून घेतली. म्हणजे या खोल्या प्रशस्त आणि मुलांच्या दृष्टीने सोशल डिस्टन्सिंग राहील अशा झाल्या. कोरोनाच्या काळानंतर आता हिवरेबाजारमध्ये शाळा सुरू झाली तेव्हा सोशल डिस्टन्सिंगचीही कोणतीही अडचण विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना आली नाही.

जिल्हा परिषदेने ही हिवरेबाजारचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने प्रशस्त आणि हवा खेळती राहील अशा मोठ्या खोल्या बांधण्याची गरज आहे. सध्या बांधकाम होत असलेल्या जिल्हा परिषदेच्या खोल्या तुलनेने खूपच लहान असल्याने शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना सोशल डिस्टन्सिंगचीही अडचण भासणार आहे. त्यामुळे प्रस्तावित ज्या ३१६ शाळा खोल्या होत आहेत त्यात बदल करून आणखी काही वाढीव तरतूद केली तर हिवरेबाजार प्रमाणे प्रशस्त खोल्या होऊन मुलांना आनंददायी वातावरणात शिक्षण घेता येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

-----------------

चार वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेने हिवरेबाजारसाठी सात खोल्या मंजूर केल्या. त्यात एका खोलीची तरतूद केवळ ३२० चौरस फुटांची होती. परंतु मुलांना वर्गात हवा खेळती रहावी, आनंददायी वातावरणात शिक्षण घेता यावे म्हणून आम्ही आहे त्या शाळा खोल्या आकाराने मोठ्या बांधण्याचे ठरवले. त्यासाठी लोकसहभागातून काही रक्कम गोळा केली व जिल्हा परिषदेची परवानगी घेऊन प्रशस्त अशा खोल्या बांधल्या. आता कोरोनाच्या काळात त्याचे महत्त्व लक्षात येत आहे. जिल्हा परिषदेने किंवा इतर गावांनी ही काही प्रमाणात लोकसहभाग घेऊन अशा खोल्यांची रचना केली तर भविष्यात विद्यार्थ्यांसाठी ती मोठी उपलब्धी ठरेल.

- पोपटराव पवार, राज्य कार्याध्यक्ष आदर्श गाव समिती

-----------------

हिवरेबाजार मधील शाळा खोली ७२० चौरस फूट आकाराची असून तिला साडेसहा लाख रुपये खर्च आला आहे. त्या तुलनेत जिल्हा परिषद सध्या केवळ ३२० चौरस फुटांची खोली बांधत असून त्यासाठी ८ लाख ७५ हजार रुपये खर्च करत आहे. जिल्हा परिषदेने हिवरेबाजार पॅटर्न वापरला तर खर्चात बचत होऊन तुलनेत आकाराने मोठ्या खोल्या होऊ शकतात का, याची चाचपणी करण्याची मागणी पुढे येत आहे.

Web Title: Will there be school rooms in the district on the lines of Hivrebazar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.