अनधिकृत शाळांवर गुन्हे नोंदविणार
By Admin | Updated: June 27, 2014 00:19 IST2014-06-26T23:55:50+5:302014-06-27T00:19:41+5:30
अहमदनगर : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा व संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा व शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला़

अनधिकृत शाळांवर गुन्हे नोंदविणार
अहमदनगर : जिल्ह्यातील अनधिकृत शाळा व संस्था चालकांवर गुन्हे दाखल करण्याचा व शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत घेण्यात आला़
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि़२६) झाली़ बाळासाहेब हराळ यांनी जिल्ह्यातील अनधिकृत शाळांचा मुद्दा उपस्थित केला़ शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता सुरु झालेल्या काही अनधिकृत शाळांची नावेच हराळ यांनी सभेत जाहीर केली़ या शाळांबाबत शिक्षण विभागही अनभिज्ञ होता़ हराळ यांच्या मुद्याची दखल घेत अनधिकृत शाळा व संस्थाचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिले़ वाळकी गटात शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वाटप करुन आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम गेल्या सहा महिन्यापासून राबविण्यात येत असल्याचे बाळासाहेब हराळ यांनी सांगून जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना आरोग्य कार्डाचे वाटप करावे, अशी मागणी केली़ हराळ यांची ही मागणी मान्य करीत प्राथमिक आरोग्य केंद्रातून शेतकऱ्यांना आरोग्य कार्ड वितरीत करण्याचा व त्यासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला़ अकोले, नेवासा, पारनेर, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथर्डी येथे नगरपंचायत व नगरपरिषदांची स्थापना करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे़ त्यासाठी जिल्हापरिषदेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा ठरावही या सभेत घेण्यात आला़
शॉपिंग सेंटर बांधण्यासाठी कुकाणा (ता़ नेवासा) ग्रामपंचायतीला ३० लाख व म्हातारपिंप्री (ता़ श्रीगोंदा) ग्रामपंचायतीला २२ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली़ तर वडगाव लांडगा (ता़ संगमनेर) ग्रामपंचायतीच्या कार्यालयासाठी ११ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याची शिफारस करण्यात आली़
यावेळी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा मोनिका राजळे, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, समाजकल्याण समितीचे सभापती शाहूराव घुटे, बालकल्याण समितीच्या सभापती हर्षदा काकडे, कृषी समितीचे सभापती बाबासाहेब तांबे यांच्यासह सदस्य व विभागप्रमुख उपस्थित होते़
(प्रतिनिधी)
लाखो रुपयांच्या योजनांना मान्यता
पहिली ते बारावीच्या सुमारे १२०० विद्यार्थिनींनी लेडीज सायकल पुरविण्यासाठी ३९ लाख ६० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़
विशेष घटक योजनेअंतर्गत सुमारे ६५६ मागासवर्गीय महिलांना मोफत पिको फॉल पुरविण्यासाठी ४० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला़
महिला व बालकल्याण विभागाअंतर्गत ग्रामीण भागातील ७३८ महिलांना मोफत पिको फॉल पुरविण्यासाठी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़
सातवी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थिनींना एमएससीआयटीचे प्रशिक्षण देण्यासाठी ४५ लाख रुपये मंजूर करण्यात आले़
ग्रामीण व आदिवासी ६६६६ मुलींना स्वसंरक्षणार्थ व शारिरीक विकास प्रशिक्षणासाठी ४० लाख रुपये मंजूर करण्यात आले़
आदिवासी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांना आहार पुरविण्यासाठी ६ लाख व विशेष आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी ३७ लाख ९६ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़
हातपंप दुरुस्तीसाठी ३० कंत्राटी कर्मचारी व ३९ लाख ५२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला़
मीटरने पाणी
शेवगाव-पाथर्डी प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनेवरील बिलाची वसुली होत नसल्यामुळे वीज बिल भरणे शक्य होत नाही़ त्यामुळे या योजनेवरील गावांना आता मिटरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे़ त्यासाठी ३३ लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेने मंजूर केला आहे़ त्यामुळे आता बुऱ्हाणनगर पाणी योजनेप्रमाणेच शेवगाव-पाथर्डी पाणी योजनेवरही मीटर बसणार आहे़