पिंपळगाव माळवी तलावाची दैना संपेल काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:20 IST2021-09-13T04:20:18+5:302021-09-13T04:20:18+5:30
पिंपळगाव माळवी : पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा महापौर रोहिणी शेंडगे शब्द पाळतील का? अशी चर्चा परिसरात ...

पिंपळगाव माळवी तलावाची दैना संपेल काय?
पिंपळगाव माळवी : पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचा महापौर रोहिणी शेंडगे शब्द पाळतील का? अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या परिसराला अनेक दिवसांपासून विकासाची प्रतीक्षा आहे. आता तरी येथील दैना संपेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नगर शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेला पिंपळगाव माळवी तलाव सलग दुसऱ्या वर्षी ओव्हरफ्लो झाला आहे. महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते नुकतेच जलपूजन करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर अनिल बोरुडे, संभाजी कदम, नगरसेवक गणेश कवडे, सचिन शिंदे, शाम नळकांडे, पिंपळगाव माळवीच्या सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच भारती बनकर, सेवा संस्था शशिकांत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड उपस्थित होते.
यावेळी महापौर शेंडगे यांनी पिंपळगाव माळवी तलावाचा विकास करण्याचे आश्वासन दिले. सातशे एकरवर पसरलेल्या पिंपळगाव माळवी तलावाची मालकी मागील चार वर्षांपासून महानगरपालिकेकडे गेली आहे. ब्रिटिश काळात १९२० साली पूर्ण झालेल्या या तलावाने पन्नास वर्षे नगर शहराची तहान भागविली. १९९२ पासून या तणावातून नगर शहराला पाणीपुरवठा बंद झाल्यापासून महानगरपालिकेचे या तलाव परिसराकडे पूर्ण दुर्लक्ष झाले आहे.
या तलाव परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यास खूप वाव असून मागील प्रत्येक महापौरांनी तलाव परिसरात वॉटर पार्क सुरू करण्याचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. या तलावाजवळच डोंगरगण, मांजरसुंबा गड, गोरक्षनाथ, मेहेराझाद अशी धार्मिक पर्यटनस्थळे आहेत. या तलावाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केल्यास नगर शहरवासीयांसाठी हक्काचे पर्यटनस्थळ उपलब्ध होऊन परिसरातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यामुळेच महापौर रोहिणी शेंडगे यांनी पिंपळगाव माळवी तलाव परिसराचा विकास करण्याचे दिलेले आश्वासन पाळावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांची आहे.
110921\4540img_20210911_143020.jpg
सलग दुसऱ्या वर्षी तुडुंब भरलेला पिंपळगाव माळवी तलाव.
छायाचित्र : खासेराव साबळे