यंदा भंडारदरा-निळवंडेची घागर रिकामी राहणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:21 IST2021-09-03T04:21:32+5:302021-09-03T04:21:32+5:30

अकोले : यंदा ऑगस्ट संपला तरी भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणाची घागर रिकामी आहे. मोसमी पावसाचे आणखी तीन नक्षत्रे ...

Will the Bhandardara-Nilwande jar be empty this year? | यंदा भंडारदरा-निळवंडेची घागर रिकामी राहणार?

यंदा भंडारदरा-निळवंडेची घागर रिकामी राहणार?

अकोले : यंदा ऑगस्ट संपला तरी भंडारदरा, निळवंडे व आढळा धरणाची घागर रिकामी आहे. मोसमी पावसाचे आणखी तीन नक्षत्रे बाकी आहेत. त्यातील हस्त नक्षत्र बरसले तरच तालुक्यातील धरणे भरण्याची शक्यता वाटते. तर कमी पाऊस लक्षात घेऊन पाटपाण्याचे आंदोलन चिघळण्याची शक्यता वाटते. पावसाचे आगार अशी ओळख असलेल्या अकोले तालुक्याकडे यंदा पावसाने कानाडोळा केल्यासारखे दिसतेय.

सध्या भंडारदरा -निळवंडे धरण पाणलोटातील जिल्ह्याची चेरापुंजी अशी ओळख झालेल्या घाटघर-रतनवाडी भागात श्रावणातील शेवटच्या चरणात ऊन- सावल्यांच्या खेळासह भुरभुर पाऊस सुरू असल्याचे जलसंपदाचे सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. तीन महिन्यात घाटघर येथे ३३६९ मिमी तर रतनवाडी येथे २८२६ मिमी पाऊस झाला असून येथे दरवर्षी सरासरी साडेचार-पाच हजार मिमी पाऊस होत असतो. यंदा पाऊस मुळा-भंडारदरा पाणलोटावर रुसल्यासारखा वाटतो. आजमितीला भंडारदरा ९३६८, निळवंडेत ६३३८ तर आढळा धरणात ५६० दशलक्ष घनफूट इतका पाणीसाठा आहे. दरम्यान, दुष्काळाची चाहूल लक्षात येताच निळवंडे कालवे पाटपाण्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

३१ डिसेंबर २०२१ पर्यंत म्हाळादेवी जलसेतूचे काम पूर्ण करून उच्चस्तरीय कालव्यातून अकोले तालुक्यासाठी पाणी सोडा अशी प्रमुख मागणी घेऊन उजवा उच्चस्तरीय कालवा संघर्ष समितीने ३ सप्टेंबरला आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. जायकवाडीला पाणी सोडावे लागले तर अकोलेची जनता आंदोलन करेल यात शंका नाही. उच्चस्तरीय पाईप कालवे दहा वर्षांपूर्वीच मंजूर झाले पण काम अद्याप रखडले आहे. डावा उच्चस्तरीय कालवा सुरू होऊन चार-पाच वर्षे झाली पण उजवा उच्चस्तरीय कालवा म्हाळादेवी जलसेतूमुळे कार्यान्वित होऊ शकला नाही. काही महिन्यांपूर्वी जलसंपदा मंत्री अकोलेत आले तेव्हा त्यांनी जलसेतूचे काम मार्च २०२२ ला पूर्ण होईल, असे स्पष्ट केले. आता कालवा संघर्ष कृती समितीला जाग आली असून आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते सहभागी होणार, असे बोलले जाते.

...................

कार्यकर्ते आक्रमक

जास्त पुढाकार माकप, राष्ट्रवादी व सेनेचा दिसत आहे. संगमनेर शहर पाणी योजना व म्हाळादेवी जलसेतू या बाबींच्या माध्यमातून महसूल मंत्री यांना लक्ष्य केले जात असल्याने राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आंदोलनात दिसत नाही. भाजपही काही अंतरावर असून तालुक्यातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तसेच धामणगाव आवारी येथील गावकरी अधिक सक्रिय सहभागी दिसत आहेत. राष्ट्रवादीचे जलसंपदा मंत्री असून कार्यकर्त्यांचा आक्रमक पवित्रा या बाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मंगळवारी शेतकरी नेते डाॅ. अजित नवले, राष्ट्रवादीचे बाळासाहेब भोर, सुरेश खांडगे, बाळासाहेब आवारी, आबंडच्या सरपंच रेश्मा कानवडे, नीता आवारी, भाग्यश्री आवारी, सेनेचे मच्छिंद्र धुमाळ यांनी पत्रकार परिषदेत महसूल मंत्री, जलसंपदाचे अधिकारी, जलसेतूचा ठेकेदार यांना लक्ष्य करत आक्रमक भूमिका मांडली.

Web Title: Will the Bhandardara-Nilwande jar be empty this year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.