कृषी सहायक भेटेल का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2016 23:47 IST2016-02-26T23:26:30+5:302016-02-26T23:47:56+5:30
अण्णा नवथर, अहमदनगर नगर तालुक्यातील वाळकी गावातील कृषी मंडल अधिकारी कार्यालयास ‘लोकमत’ प्रतिनिधींनी गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता भेट दिली

कृषी सहायक भेटेल का?
अण्णा नवथर, अहमदनगर
नगर तालुक्यातील वाळकी गावातील कृषी मंडल अधिकारी कार्यालयास ‘लोकमत’ प्रतिनिधींनी गुरुवारी सकाळी सव्वा अकरा वाजता भेट दिली असता कार्यालय बंद होते़ ‘टीम’ पाहताच शेजारी असलेल्या किराणा दुकानातून एक कर्मचारी धावत आला़ कार्यालय बंद आहे का? असा प्रश्न केला असता संबंधित कर्मचाऱ्याने नाही..नाही..उघडतो, असे सांगून कार्यालय उघडले़
मंडल अधिकारी कोठे आहेत? या प्रश्नावर ‘ते येणार आहेत, फोन करून पाहतो’ असे उत्तर या कर्मचाऱ्याने दिले. कार्यालयाची महिती विचारली असता आठवड्यातून एक बैठक होते, त्यावेळी सर्व उपस्थित असतात़ मंडल अधिकाऱ्यांना तालुक्याला काम नसेल तर ते येतात, असे उत्तर मिळाले.
कृषी सहायक कोठे असतात? असे विचारले असता, ‘मीच आहे, प्रकरण घेऊन आलो होतो’ असे सदर कर्मचारी म्हणाला. हा वाळकीतीलच कृषी सहायक होता. मी गावातील शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना योजनांची माहिती देत असतो. शेतकऱ्यांचे फळबागा व शेततळ्यांचे प्रस्ताव घेऊन आलो असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, हे कृषी सहायक कार्यालय बंद ठेऊन बाहेर का उभे होते हे समजले नाही. सव्वा अकरा वाजता कार्यालय कुलूप बंद का आहे? असे विचारले असता ‘शिपाई आला नाही,’ अशी सारवासारव केली.
कृषी सहायक
ना बांधावर, ना टेबलावर
शेतीसाठीच्या सरकारी योजना शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी गाव पातळीवर मंडल कृषी अधिकारी कार्यालये आणि त्याअंतर्गत कृषी सहायकांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी पूर्णवेळ शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहेत. मात्र, अनेक गावांना कृषी सहायकांचे दर्शनच घडत नाही. मंडल कार्यालयात गेल्यावर कृषी सहायक दौऱ्यावर आहेत, असे उत्तर मिळते. प्रत्यक्षात ‘साहेब’ ना शेतकऱ्यांच्या बांधावर असतात ना टेबलवर. ‘लोकमत’च्या प्रतिनिधींनी जिल्ह्यात ठिकठिकाणी केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’ मध्ये या कार्यालयांत शुकशुकाट दिसला. साहेबांऐवजी भेटले ते हताश शेतकरी...