कावडींची परंपरा मोडता मग, महिला प्रवेशाची का नाही?
By Admin | Updated: April 7, 2016 23:55 IST2016-04-07T23:49:22+5:302016-04-07T23:55:45+5:30
सुधीर लंके, अहमदनगर एखादी गोष्ट पुढे दामटण्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतात याची प्रचिती शिंगणापूर देवस्थान घेत आहे.

कावडींची परंपरा मोडता मग, महिला प्रवेशाची का नाही?
सुधीर लंके, अहमदनगर
एखादी गोष्ट पुढे दामटण्यासाठी किती तडजोडी कराव्या लागतात याची प्रचिती शिंगणापूर देवस्थान घेत आहे. महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊ द्यायचे नाही या अट्टाहासापायी शिंगणापूर देवस्थानला आता आपल्या इतर परंपराही गुंडाळाव्या लागत आहेत. त्यामुळे देवस्थानचा आता महिलांसोबत भक्तांशी व ग्रामस्थांशीही संघर्ष सुरु झाला आहे. इतर परंपरा मोडल्या तर चालतात मग महिला प्रवेशाबाबतची एक परंपराच का मोडता येत नाही? याचेही उत्तर आता देवस्थानला द्यावे लागेल.
शनिची शिळा असलेल्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश न देण्याची शेकडो वर्षाची परंपरा आम्ही मोडीत काढणार नाही, असे शिंगणापूर देवस्थानचे व ग्रामस्थांचे म्हणणे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतरही देवस्थान या परंपरेला चिकटून आहे. ही परंपरा जपण्यासाठी देवस्थानने पुरुषांचाही चौथऱ्यावरील प्रवेश बंद केला आहे. अर्थात पुरुष पुजारी पूजेसाठी वरती जातात. महिलांना रोखण्यासाठीचा एक युक्तिवाद म्हणून देवस्थानचा हा निर्णय गावाला व भाविकांना आजवर मान्य होता. मात्र, आता कावडीधारक पुरुषांचाही प्रवेश अडला आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी कावडीधारक भक्त हे शिंगणापुरात येऊन शिळेवर गंगाजल वाहतात. प्रवरासंगम व काही भाविक थेट काशीवरुन हे जल आणतात. ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे. गतवर्षीपर्यंत सुरु होती. यादिवशी पुरुषांना चौथऱ्यावर जाता येत होते. मात्र, आता कावडीधारकांना चौथऱ्यावर जाऊ दिले तर आपला स्त्री-पुरुष समतेचा युक्तिवाद खोटा ठरेल, या भितीपोटी देवस्थानने कावडीधारकांनाही चौथरा प्रवेश बंद केला आहे. कावडीधारक जल चौथऱ्याखाली स्टिलच्या भांड्यात सोडतील. तेथून ते विद्युत पंपाद्वारे शनिच्या शिळेवर पोहोचविले जाईल. महिलांना रोखण्यासाठी ‘इंजिनिअरिंग’चा हा द्रविडी प्राणायाम देवस्थानला चालतो. पण, सोशल इंजिनिअरिंगसाठी देवस्थान तयार नाही.
देवस्थानने आपल्या बचावात्मक भूमिकेमुळे अनेक प्रश्न निर्माण केले आहेत. महिला प्रवेश बंदीची परंपरा आम्ही मोडणार नाही, असे सांगणारे देवस्थान कावडींच्या प्रवेशाची परंपरा मोडायला तयार कसे झाले? यापूर्वी ओल्यावस्त्रानिशी भाविक चौथऱ्यावर जात होते. तीही परंपरा देवस्थानने बंद केली. भाविकांनी थेट शिळेवर तेल वाहण्याची परंपराही बंद केली. या परंपरा मोडीत काढणे शक्य झाले, तर मग महिलांच्या परंपरेबाबतच अट्टाहास कशासाठी? पुरुष पुजारी व पुरुष सुरक्षारक्षक जसे चौथऱ्यावर जातात तसे प्रातिनिधीक स्वरुपात एखाद्या महिलेला प्रवेश देऊन हा प्रश्न का मिटविला जात नाही? याचे उत्तर देवस्थानला द्यावे लागेल.
देवस्थान हे स्त्री-पुरुष समतेचा दावा करत असले तरी त्यांची ही भूमिका प्रामाणिक वाटत नाही. कावडीधारकांना चौथऱ्यावर जाऊ न देणे ही देवस्थानची तडजोड आहे़ त्यांना जाऊ दिले तरी देवस्थान उघडे पडणार आहे. देवस्थान चक्रव्यूहात फसत चालले आहे. इकडून आड तिकडून विहीर अशी त्यांची अवस्था झाली आहे.
शिंगणापूर देवस्थानच्या अध्यक्षपदी महिलेची निवड करुन देवस्थानने एक क्रांतिकारी पाऊल टाकले आहे़ त्यामुळे महिला प्रवेशाचा प्रश्न निकाली काढून देवस्थानने महिला अध्यक्षांची निवड सार्थ ठरवावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे़
गडाख यांचे मौन कधी सुटणार?
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख हे शनी शिंगणापूर देवस्थानचे सर्वेसर्वा आहेत. हा वाद राज्य व देशभर गेला असताना गडाख यांनी या विषयावर आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. शिंगणापूर विषय हा संवेदनशील बनला असताना गडाख यांचे मौन का? अशी टीका आता त्यांच्यावर होऊ लागली आहे. गडाख हे सुसंस्कृत नेते म्हणून ओळखले जातात़ पाडव्याला समतेची गुढी उभारण्याच्या दृष्टीने त्यांनी काही तोडगा काढावा, अशी अपेक्षा आहे़