रोहित टेके
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : राज्यात सर्वच व्यवहार अनलॉक करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये लोकल ट्रेनदेखील सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. दौंड-मनमाड दररोज सर्वच प्रकारच्या एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. मात्र, याच मार्गावरील सर्वसामान्यांच्या प्रवासाच्या व भाड्याच्या दृष्टीने परवडणारी पॅसेंजर रेल्वे अद्यापही लॉक का ? असाच प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांकडून विचारला जात आहे.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दौंड- मनमाड हा लोहमार्ग अहमदनगर जिल्ह्यातून जातो. या मार्गावर जिल्ह्यात १६ पेक्षा जास्त रेल्वेस्थानके आहेत. या सर्वच रेल्वेस्थानकांवरून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. यापूर्वी नगर, दौंड, पुणे येथे जाण्यासाठी एकूण तीन पॅसेंजर गाड्या, तर मनमाड, मुंबई, नांदेड येथे जाण्यासाठी तीन अशा वेगवेगळ्या वेळेत सहा पॅसेंजर गाड्या सुरू होत्या. कोरोना या वैश्विक संकटामुळे मागील वर्षी सर्वच जनजीवन विस्कटले होते. त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रावर झाला. तसा रेल्वेवरदेखील झाला होता. या मार्गावरून हजारो प्रवासी ये-जा करतात. ज्यामध्ये विविध पेन्शनधारक, शासकीय, तसेच खासगी आस्थापनांमध्ये काम करणारे कर्मचारी, वैद्यकीय उपचारासाठी, नोकरीसाठी पॅसेंजर रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. याउलट याच मार्गावरून दररोज ३० पेक्षा जास्त एक्स्प्रेस आजही सुरू आहेत.
................
बंद असलेल्या पॅसेंजर रेल्वे
मनमाड-पुणे,
पुणे-मनमाड
पुणे-नांदेड (दोन)
नांदेड-पुणे (दोन)
..........
दौंड-मनमाड मार्गावर एकही एक्स्प्रेस सद्य:स्थितीत बंद नाही.
........
सुरू असलेल्या एक्स्प्रेस..
महाराष्ट्र, झेलम, कर्नाटक, गोवा, संपर्कक्रांती (दोन), हमसफर (सुपर फास्ट), हबीबगंज, आझाद हिंद (सुपर फास्ट), पाटलीपुत्र, गरीब रथ, दुरांतो, वाराणसी (दोन), ज्ञानगंगा, दरभंगा, शिर्डी येथून (सात), फेस्टिव्हल, कोविड स्पेशल यासह देशभरात जाणाऱ्या ३० पेक्षा जास्त एक्स्प्रेस दौंड-मनमाड या रेल्वे मार्गावरून सुरू आहेत.
.............
मला नेहमी कामानिमित्त राज्यभर भ्रमंती करावी लागते. त्यासाठी रेल्वे एक्स्प्रेसचा वापर करावा लागतो. जनरल डब्यात जागा मिळत नसल्याने रेल्वेचे रिझर्व्हेशन करून जावे लागते. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.
- दिनेश वीर, प्रवासी
...........
पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामुळे थेट गावातून गाडी मिळत नाही. रेल्वेचा प्रवास करावयाचा असल्यास कोपरगाव रेल्वेस्थानकावर जावे लागते, तसेच एक्स्प्रेसमधून प्रवास करावा लागतो. त्यासाठी पॅसेंजरच्या तिकिटापेक्षा जास्त पैसे मोजावे लागतात.
- तुकाराम शिंदे, प्रवासी
........
या मार्गावरील पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यासंदर्भात अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झालेला नाही. मात्र, सुरू करण्यासंदर्भात हालचाली सुरू आहेत. त्यामुळे पुढील आठवड्यात पॅसेंजर सुरू करण्याचा निर्णय होऊ शकतो.
- भैरव प्रसाद, स्टेशन मास्तर, रेल्वे स्थानक, कोपरगाव