नवीन सोयरिक कोणाच्या पथ्यावर?
By Admin | Updated: June 11, 2014 00:16 IST2014-06-10T23:34:15+5:302014-06-11T00:16:52+5:30
काळे-घुले व्याही : राजकीय वर्तुळात चर्चा

नवीन सोयरिक कोणाच्या पथ्यावर?
अहमदनगर : कोपरगावचे शिवसेना आमदार अशोक काळे आणि शेवगाव- पाथर्डीचे राष्ट्रवादीचे आमदार चंद्रशेखर घुले व्याही झाले आहेत. काळे-घुले परिवारात झालेल्या या नवीन सोयरिकीची राजकीय चर्चा मंगळवारी दिवसभर रंगली.
आ. काळे यांचे सुपुत्र आशुतोष आणि आ. घुले यांची कन्या चैताली यांचा सारखपुडा मंगळवारी शहरात पार पडला. यावेळी दोन्ही परिवारातील सदस्य आणि काही निवडक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले होते. याची चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात झाली. कार्यक्रम पार पडल्यानंतर दुपारी जिल्हा परिषदेत काही पुढाऱ्यांनी गप्पांचा फड रंगवला. विषय नव्या सोयरिकीचा. माजी खासदार दिवंगत शंकरराव काळे आणि दिवंगत मारूतराव घुले यांच्यात प्रचंड स्नेह होता. या नेत्यांचा जिल्ह्यात दबदबा होता. त्या स्नेहाचे आता सोयरिकीत रुपांतर झाले आहे, याकडे काहींनी आवर्जून लक्ष वेधले. सोबतच भविष्यात दोन्ही कुटुंबाना याचा कसा राजकीय लाभ होणार, याचीही गणिते मांडली गेली. नगर जिल्ह्यात विविध राजकीय कुटुंबाचे आपसात नातेसंबंध आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकारणात हा ‘सोयऱ्या-धायऱ्यां’चा पक्ष कायम चर्चेत राहतो. त्यात आता या नव्या सोयरिकीची भर पडली आहे. त्यामुळे भविष्यातील राजकारणाचा ‘आखणी एक कोन’ म्हणून याकडे पाहिले जात आहे. दोन्ही कुटुंबांचे आपापल्या पक्षात भक्कम स्थान आणि दबाब गट आहे. दोन्ही परिवारांचे नातेवाईक सर्वच पक्षात असल्याने काळे-घुले सोयरिक चर्चेचा विषय ठरली आहे. (प्रतिनिधी)