कोरोनाने हिरावले कोणाचे आई, तर कोणाचे बाबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:22 IST2021-05-27T04:22:40+5:302021-05-27T04:22:40+5:30
आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेली बालके नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, राहता व पाथर्डी तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी ...

कोरोनाने हिरावले कोणाचे आई, तर कोणाचे बाबा
आई अथवा वडिलांचा मृत्यू झालेली बालके नगर शहरासह श्रीगोंदा, पारनेर, राहता व पाथर्डी तालुक्यातील आहेत. कोरोना संसर्गामुळे ज्या बालकांनी आपले पालक गमावले आहेत त्यांना संरक्षण मिळावे, तसेच ही बालके शोषणास बळी पडू नयेत, तस्करीत ओढली जाऊ नयेत यासाठी शासन आदेशाप्रमाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली निराधार बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी १७ मे रोजी टास्क फोर्स गठित करण्यात आला आहे. जिल्हा बालसंरक्षण अधिकारी वैभव देशमुख हे टास्क फोर्सचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. गेल्या दहा दिवसांत टास्क फोर्सकडे ० ते १८ वयोगटातील ३४ बालकांची माहिती प्राप्त झाली आहे. यामध्ये पूर्णतः निराधार झालेल्या बालकांचे महिला व बालकल्याण समितीअंतर्गत असलेल्या बालगृहात संगोपन केले जाणार आहे, तसेच ज्या बालकांचा कमावते पालक आई किंवा वडील यांचा मृत्यू झाला आहे त्यांना बालसंगोपन योजनेंतर्गत आर्थिक साहाय्य केले जाणार आहे.
........
‘त्या’ बालकांनाही मिळणार निवारा
ज्या बालकांचे आई-वडील कोरोना संसर्गामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत व त्यांच्या बालकांना सांभाळण्यास कोणी नाही, अशा बालकांनाही महिला व बालकल्याण विभागामार्फत निवारा दिला जाणार आहे.
........
जुळ्या मुलांची बालगृहात व्यवस्था
नगर शहर परिसरातील जुळ्या मुलांच्या मातेचे कोरोनामुळे निधन झाले. त्या मुलांचे संगोपन करणे वडिलांनाही शक्य नसल्याने या मुलांची टास्क फोर्समार्फत ढवळपुरी येथील बालगृहात व्यवस्था करण्यात आली आहे.
............
कोरोनामुळे आई-वडिलांचा मृत्यू झालेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारी महिला व बालविकास विभागामार्फत घेतली जात आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे. अशा निराधार बालकांबाबत जनतेने माहिती कळवावी. अशा बालकांना गरजेप्रमाणे तत्काळ निवारा व बालसंगोपन योजनेंतर्गत लाभ दिला जाणार आहे.
-वैभव देशमुख, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी
..........