अहिल्यानगर : सावेडी येथील वैभव नायकोडी खून प्रकरणातील आरोपींना कुणाचा वरदहस्त आहे का? हे शोधायचे आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड व मृताचा मोबाइल हस्तगत करणे बाकी असल्याने आरोपींना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी पोलिसांनी न्यायालयात केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत आरोपींना १२ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. त्यामुळे आरोपींचा पोलिस कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
सावेडी उपनगरातील वैभव नायकोडी याचा २२ फेब्रुवारी रोजी अपहरण करून खून करण्यात आला. या प्रकरणी अटकेत असलेल्या नऊआरोपींना पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले होते. यावेळी खुनाच्या गुन्ह्यात आणखी दोन अल्पवयीन मुलांची नावे निष्पन्न झाले आहेत. ते घटनेच्या वेळी आरोपींसोबत होते, असे पोलिसांनी सांगितले. मृताचा मोबाइल या घटनेतील महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो. आरोपींनी मोबाइल ज्या ठिकाणी फेकून दिला, तिथे शोध घेतला; पण मोबाइल मिळून आला नाही. तो शोधायचा आहे. तसेच आरोपींनी मृताचा मृतदेह जाळण्यासाठी लाकडाचा वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. लाकूड तोडण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड मिळून आलेली नाही. कुऱ्हाडीचा शोध घ्यायचा आहे. आरोपींना कुणाचा वरदहस्त आहे का, हेदेखील तपासायचे आहे. त्या अनुषंगाने तपास सुरू असल्याने आरोपींना पोलिस कोठडी वाढवून मिळावी, अशी मागणी तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक आनंद कोकरे यांनी न्यायालयाकडे केली.
तपासादरम्यान पोलिसांनी कपडे जप्त केले असून, गुन्ह्यात वापरलेल्या दोन चारचाकी व दोन मोटारसायकली जप्त केलेल्या आहेत. नाशिक येथील फॉरेन्सिक पथकाने मृताला मारहाण करून ज्या कारमधून नेते त्या कारची तपासणी केली आहे. कारमधील रक्ताचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. सरकारी पक्षाच्या अॅड. अमित यादव यांनी बाजू मांडली. आरोपींच्या वतीने अॅड. कैलास कोतकर, सतीश गुगळे, महेश तवले यांनी काम पाहिले.
त्या कर्मचाऱ्याची चौकशी सुरूचदरम्यान, मृताचा खून करण्यापूर्वी त्याला मारहाण होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला मिळाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिस कर्मचारी घटनास्थळी गेला होता; परंतु, त्याने आरोपींना रोखले नाही. या प्रकरणाची चौकशी पोलिस उपअधीक्षक अमोल भारती यांच्याकडून करण्यात येत आहे. या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.