टँकर गेले कुण्या गावा ? कोरडगावच्या टँकरला गळती, खेपा कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:36 IST2019-05-11T17:36:29+5:302019-05-11T17:36:36+5:30
पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे पिण्याच्या पाण्याचे अनियमित वितरण व व्यवस्थापन होत असल्याने टँकर मंजूर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे.

टँकर गेले कुण्या गावा ? कोरडगावच्या टँकरला गळती, खेपा कागदावर
दादासाहेब येडे
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव येथे पिण्याच्या पाण्याचे अनियमित वितरण व व्यवस्थापन होत असल्याने टँकर मंजूर असूनही त्याचा उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. येथील टँकर जुनाट असून, त्यात वारंवार बिघाड होतो, तसेच पाण्याची मोठ्या प्रमाणावर गळती होते. त्यामुळे टँकरच्या खेपा कागदावरच दिसतात.
कोरडगावला प्रत्येक दिवशी ५ टँकरच्या खेपा मंजूर आहेत. परंतु तरीही गावातील देशमुख गल्ली, हरिजन वस्ती, खंडोबानगर परिसरात गेल्या १० दिवसांपासून पिण्याचे पाणी आलेले नाही. त्यामुळे येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकमत प्रतिनिधीने येथील टँकरची पाहणी केली असता, त्यावर कोठेही शासकीय टँकर असल्याचा फलक नव्हता. त्यामुळे टँकर कोठून येतो, कोठे जातो, याची माहितीच मिळत नाही. बाजारपेठेचे गाव असल्याने अनेक टँकर हॉटेलवर खाली होताना दिसतात. पाण्यासाठी वापरण्यात येत असलेले टँकर जुने असून अशा टँकरकडून मोठ्या प्रमाणात अपघात होतात. मंजूर खेपा कमी पडत असून त्यामध्ये वाढ करण्याची मागणी आम्ही केली केल्याचे सरपंच विष्णू देशमुख यांनी सांगितले.
महिन्यातून एकदाच सह्या
टँकर खाली करताना गावातील पाणीपुरवठा समिती सदस्यांची सही लॉगबुकवर घ्यावी लागते. त्या सह्या या टँकरचालकाच्या लॉगबुकवर आढळल्या नाहीत. त्यावर टँकरचालकाला विचारले असता, त्याने आश्चर्यकारक उत्तर दिले. महिन्यातून एकदाच सर्व सह्या घेत असल्याचे टँकरचालकाचे उत्तर होते. टँकरला विमासंरक्षण घेतले आहे का याबाबत विचारणा केली असता त्याबाबतही काहीच माहिती नसल्याचे टँकरचालक म्हणाला.