कोपरगावातील कोविड सेंटरमधील रुग्णांना वाली कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:46 IST2021-09-02T04:46:52+5:302021-09-02T04:46:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला कोपरगावात एसएसजीएम कोविड हेल्थ सेंटर, कोविड सेंटरसाठी तालुक्याच्या आरोग्य विभागाने ...

कोपरगावातील कोविड सेंटरमधील रुग्णांना वाली कोण?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीला कोपरगावात एसएसजीएम कोविड हेल्थ सेंटर, कोविड सेंटरसाठी तालुक्याच्या आरोग्य विभागाने ठेकेदारी करार पद्धतीने डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक यांची भरती केली होती. मात्र, तालुक्यात रुग्ण आढळून येत असतानाच शासनाकडून वरील सर्वच सेवा देणाऱ्यांना ३१ ऑगस्टपासून कार्यमुक्त केल्याचे आदेश तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक योगेश चंद्रे यांनी काढले आहे. त्यामुळे सध्या बाधित म्हणून उपचार घेत असलेल्या रुग्णांना वाली कोण? असाच प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत प्रामाणिकपणे रुग्णाची सेवा करून एका झटक्यात कमी केल्याने अन्यायाची भावना कर्मचाऱ्यांमध्ये तयार झाली आहे.
गेल्या मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन रुग्णवाढदेखील मोठ्या प्रमाणात सुरू झाली होती. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तालुका प्रशासनाच्यावतीने कंत्राटी पद्धतीने आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केली होती. या सर्वच कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या लाटेतील बाधित रुग्णांची सेवा केली यात हजारो रुग्ण बरे होऊन घरीदेखील गेले. शहर तसेच तालुक्यातील एकूण ५० पेक्षा जास्त रुग्ण बाधित आहेत. त्यापैकी प्रकृती गंभीर असलेले १६ रुग्ण हे ग्रामीण रुग्णालयात तर १० पेक्षा जास्त रुग्ण हे एसएसजीएम कोविड हेल्थ सेंटरला उपचार घेत आहेत. कर्मचारी कमी केल्याने त्यांच्या उपचाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे भाकीत वर्तविले जात असताना आरोग्य कर्मचारी कमी केल्याने हा निर्णय कशाच्या आधारे घेतला आहे. हे सध्या तरी समजणे कठीण आहे.
.............
सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यातच सेवा देणारा कंत्राटी स्टाफ कमी केला आहे. ग्रामीण रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना उपलब्ध स्टाफवर उपचार देता येतील. मात्र, एसएसजीएम येथील कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना सेवा देणे कठीण होणार आहे.
- डॉ. कृष्णा फुलसौदर, नोडल अधिकारी, कोपरगाव
............
कार्यमुक्त करण्यात आलेला सर्व कंत्राटी स्टाफ हा वरिष्ठांच्या सूचनेनुसार कमी करण्यात आला आहे. त्यामुळे कायमस्वरूपीच्या उपलब्ध स्टाफकडून हे काम करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- डॉ. विकास घोलप, तालुका वैद्यकीय अधिकारी, कोपरगाव
...........
कार्यमुक्त केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठीच्या अनुदानाची तरतूद झाली नसल्याने वरिष्ठांच्या सूचनेनुसार संबंधित कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे यासंदर्भातील पुढील निर्णय हा वरिष्ठांच्या सूचनेनुसार घेण्यात येईल.
- योगेश चंद्रे, तहसीलदार, कोपरगाव
...............
आम्ही कोरोना काळात स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना रुग्णाची सेवा केली. कारण त्यातून मिळणाऱ्या पगारातून आमच्या कुटुंबाची गुजराण होत होती. आता अचानक कामावरून बंद केल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रवी जगताप
..........
असे आहेत कार्यमुक्त केलेले कर्मचारी
वैद्यकीय अधिकारी - ३
जी. एन. एम. - ११
ए. एन. एम. - ५
लॅब टेक्निशियन - २
औषध निर्माता - २
डाटा एंट्री ऑपरेटर - ३
वॉर्ड बॉय - १४
सुरक्षारक्षक - ४