कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:25+5:302021-07-05T04:14:25+5:30
महापालिकेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापना केली आहे. भाजप विरोधात बसेल, ...

कुजबुज
महापालिकेत महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापना केली आहे. भाजप विरोधात बसेल, असे खासदार डॉ. सुजय विखे यांनी महापौर, उपमहापौर निवडणुकीआधीच जाहीर करून टाकलेले. गतवेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौर झाले. राष्ट्रवादीने मागील अडीच वर्षे भाजपला आणि त्यानंतर आता शिवसेनेला पाठिंबा दिला. महापौर पदासाठी भाजपकडे उमेदवार नव्हता. हे जरी खरे असले तरी महापौर व उपमहापौर निवडणुकीत भाजपने एक्झिट घेतली, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. वास्तविक पाहता कायदेशीरदृष्ट्या विरोधी पक्षनेते पद भाजपालाच मिळणार आहे. पण, तसे पत्र महापौरांनी द्यावे लागते. इथे ते सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाला मिळते, असा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे हे पत्र मिळविण्यासाठी भाजप तटस्थ राहिले. राष्ट्रवादीचे गणेश भाेसले यांनी उपमहापौर पदाचा पदभार घेताना १ जून म्हणजे एक सात अशी तारीख आहे, सर्वांना एक साथ घेऊन कारभार करणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थित जाहीर केले. त्यांचे हे विधान तसे मनपातील पुढील राजकीय गणिते उलगडणारेच म्हणावे लागेल. भाजपही आमचा मित्रपक्ष आहे, त्यांना महापालिकेत बसण्यासाठी एखादी तरी कॅबिन द्यावी लागेल. विरोधी पक्षनेते पद भाजपला देऊन त्यांना सत्तेत सहभागी करून घेतले जाईल, असे राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने खासगीत बोलताना सांगितले. उपमहापौर भोसले यांचे विधान या अर्थाने बरोबरच होते.