दीड लाखाची लाच घेताना सहायक अभियंत्याला अटक

By Admin | Updated: May 5, 2016 00:02 IST2016-05-04T23:50:50+5:302016-05-05T00:02:20+5:30

श्रीरामपूर : रस्त्याच्या कामाचे बिल रेकॉर्ड करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागातील सहायक अभियंता अशोक केशव मुंडे (वय ५०, रा. औरंगाबाद)

While taking a bribe of one and a half lakh, the assistant engineer was arrested | दीड लाखाची लाच घेताना सहायक अभियंत्याला अटक

दीड लाखाची लाच घेताना सहायक अभियंत्याला अटक

श्रीरामपूर : रस्त्याच्या कामाचे बिल रेकॉर्ड करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच घेताना श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागातील सहायक अभियंता अशोक केशव मुंडे (वय ५०, रा. औरंगाबाद) यास बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडून अटक केली.
श्रीरामपूर रेल्वे स्थानकासमोरील अहमदनगर जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहात तक्रारदार ठेकेदार मतीन शेख यांच्याकडून दुपारी २ वाजेच्या सुमारास १ लाख ४८ हजार २०० रुपयांची रक्कम स्वीकारताना लावलेल्या सापळ्यात तो अलगद अडकला. पैसे स्वीकारताच त्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लगेचच पकडले.
मुंडे यांना लाचेची रक्कम देण्याची तयारी नसल्याने तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अहमदनगर येथील कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडे याबाबत तक्रार नोंदविली होती. त्यानुसार मुंडे याला १ लाख ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहातच रंगेहाथ पकडण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक इरफान शेख, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, हेडकाँस्टेबल सुनील पवार, वसंत वाव्हळ, काशीनाथ खराडे, पोलीस नाईक प्रमोद जरे, राजेंद्र सावंत, तनवीर शेख, नितीन दराडे, चालक पोलीस हेडकाँस्टेबल अंबादास हुलगे यांनी ही कारवाई केली. (प्रतिनिधी)
कामाची बिले काढण्यासाठी मागितली लाच
अहमदनगर जिल्हा परिषदेचे नोंदणीकृत ठेकेदार असलेल्या मतीन शेख यांनी श्रीरामपूर पंचायत समितीच्या बांधकाम उपविभागांतर्गत गोंडेगाव-उंदिरगाव-खानापूर रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या कामाचे बिल मुंडे याने काढले असून ही रक्कम ठेकेदारास मिळाली आहे. या कामाचे सीलकोट, मजबुतीकरण, मंजूर रस्त्याच्या बांधकामाच्या मिळालेल्या बिलाच्या मोबदल्यापोटी तसेच उर्वरित कामाचे बिल रेकॉर्ड करण्यासाठी मुंडे याने तक्रारदाराकडे मंजूर बिलाच्या ५ टक्केप्रमाणे दीड लाख रुपयांची मागणी केली होती.

Web Title: While taking a bribe of one and a half lakh, the assistant engineer was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.