एकही वाळू लिलाव नसताना ‘मुळा’तून टिच्चून वाळूउपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 15:07 IST2019-06-14T15:07:09+5:302019-06-14T15:07:53+5:30
राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून, महसूल प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी,

एकही वाळू लिलाव नसताना ‘मुळा’तून टिच्चून वाळूउपसा
अहमदनगर : राहुरी तालुक्यातील दरडगाव थडी येथील मुळा नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असून, महसूल प्रशासनाने यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा स्थानिक शेतकरी व नागरिकांच्या सहभागातून तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवप्रहार संघटनेच्या वतीने संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
भोर यांनी निवेदनात म्हटले आहे की, दरडगाव थडी येथील वेणूनाथ जयराम वाघ यांच्या मालकीच्या गट नंबरमधून वनकुटे येथील राहुल जाधव यास २५० ब्रास माती मिश्रित वाळू उचलण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात अन्य भागातून विनापरवाना शेकडो ब्रास वाळूचा दररोज उपसा होत आहे. सदर वाळू उत्खननासाठी यांत्रिक साधनांचा वापर करण्यास सक्त निर्बंध असतानाही या ठिकाणी जेसीबीच्या साह्याने ठरवून दिलेल्या क्षेत्राबाहेर रात्रंदिवस नियमबाह्य वाळू उपसा सुरू आहे. परंतु प्रशासनाची याकडे डोळेझाक होत आहे.
अवैध वाळू उत्खनन थांबवण्यात यावे व योग्य ती कारवाई करावी यासाठी शिवप्रहार संघटनेच्या वतीने यापूर्वी तोंडी तक्रारी करूनही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. आता दरडगाव थडी येथील अवैध उपशाबाबत येथील व्हिडिओ चित्रीकरणच पुराव्यादाखल दिले आहे. त्यामुळे संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच वाळू चोरी रोखण्यास असमर्थ असलेल्या महसूल प्रशासनातील संबंधित तलाठी, मंडलाधिकारी व तहसीलदार यांच्यावर तातडीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अन्यथा शिवप्रहार संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.