बँकांमधील गर्दीचे करायचे काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:12+5:302021-05-04T04:10:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मागील महिन्यात ३ तारखेपासून राज्यात कडक निर्बंध लावत लॉकडाऊन ...

बँकांमधील गर्दीचे करायचे काय ?
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने मागील महिन्यात ३ तारखेपासून राज्यात कडक निर्बंध लावत लॉकडाऊन केला आहे. नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास किंवा गर्दी करण्यास प्रतिबंध केला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यावरील गर्दी बऱ्याचअंशी आटोक्यात आली आहे. मात्र, शहरासह तालुक्यातील बहुतांश बँकांमधील गर्दी कमी होत नाही. त्यामुळे या बँकांमधील गर्दीचे करायचे काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोपरगाव तालुक्यात एकूण ७ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकांच्या शहर व तालुका मिळून एकूण १६ शाखा आहेत. सध्या बँकांचे व्यवहार सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत सुरू आहेत. या बँकांमध्ये सर्व प्रकारच्या ग्राहकांची खाती आहेत. त्यामध्ये शेतकरी, नोकरदार, पेन्शनर्स, व्यावसायिक यांच्यासह इतरही विविध प्रकारची खाती आहेत. सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद ठेवण्यात आले आहे. मात्र, बँकांतील गर्दी कमी होण्याचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही.
सध्या बँकेत पैसे टाकणे, पैसे काढणे व चेक क्लिअरिंग करणे असे तीनच प्रकारचे व्यवहार सुरू आहेत. इतर सर्व व्यवहार बंद आहेत. तरीही बँकांमध्ये गर्दी होत आहे. त्यामुळे बँकांतून होणाऱ्या गर्दीमुळेदेखील कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही बँकांमध्ये बहुतांश प्रमाणात सरकारी तसेच खासगी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची खाती आहेत. पैसे काढण्यासाठी आजही त्यांना बँकेतच यावे लागत आहे. त्यांनाही त्यामुळे बँकांमधील होणारी गर्दी कमी करण्यासाठी देखील उपाययोजना होणे गरजेचे आहे, तरच कोरोनाला रोखण्यात पूर्णपणे यश मिळवू शकतो.
..........
आमच्या बँकेत पैसे टाकणे, पैसे काढणे व चेक क्लिअरिंग करणे असे तीनच प्रकारचे व्यवहार सुरू आहेत. मात्र, आमच्या शाखेत पेन्शनधारकांचे सर्वाधिक खाते असल्यानेच बँकेत येतात. व्यवहार करताना गर्दी टाळण्याच्या दृष्टीने फक्त ४ व्यक्तींना आत घेतले जाते. आतील व्यक्तींचे काम झाले, की त्यानंतरच्या दुसऱ्या ग्राहकांना आत घेतले जाते.
- शीतल मतकर, शाखाधिकारी, बँक ऑफ इंडिया, कोपरगाव.
..................
सध्या बँकेत दररोज रोख स्वरुपात पैसे काढणाऱ्या ग्राहकांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ग्राहक बँकेत येत आहेत. मात्र, बँकेत गर्दी टाळण्याच्या दृष्टीने मर्यादित ग्राहकांनाच प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व प्रकारची खबरदारी घेतली जात असून काही कर्मचारी देखील बाधित होत आहे.
- पुष्पराज गौतम, शाखाधिकारी, बँक ऑफ बडोदा, कोपरगाव
...............
मला कौटुंबिक कामासाठी काही रोख पैश्यांची गरज होती. ते काढण्यासाठी बडोदा बँकेत आलो होतो. परंतु, दोन तास रांगेत उभे राहावे लागले.
- ज्ञानेश्वर मोरे, कोपरगाव
..........
माझ्या नावाने एक चेक आहे. तो वठवण्यासाठी बँक ऑफ इंडिया या बँकेत आलो होतो. ग्राहकांची गर्दी होत असल्याने बँकेत टप्याटप्याने आत सोडण्यात येत आहे.
- देविदास कानडे, कोपरगाव
............
पुण्यात मित्राला दवाखाण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यासाठी त्याच्या खात्यावर पैसे टाकण्यासाठी बडोदा बँकेत आलो होतो. परंतु, गर्दी टाळण्यासाठी चार - पाच जणांना आत सोडले जाते. त्यामुळे तासाभरापासून रांगेत उभा आहे.
- किरण जाधव, कोपरगाव
.............