विहीर, बोअरवेलमधून विद्युत मोटारींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:33 IST2021-02-05T06:33:55+5:302021-02-05T06:33:55+5:30
बोधेगाव येथील गोकुळ काकासाहेब घोरतळे (वय ३५) यांची सोनविहीर फाट्यानजीक शेवगाव - गेवराई मार्गालगत गट नंबर ५२७मध्ये शेतजमीन आहे. ...

विहीर, बोअरवेलमधून विद्युत मोटारींची चोरी
बोधेगाव येथील गोकुळ काकासाहेब घोरतळे (वय ३५) यांची सोनविहीर फाट्यानजीक शेवगाव - गेवराई मार्गालगत गट नंबर ५२७मध्ये शेतजमीन आहे. या शेतात त्यांनी रब्बी पिकांसोबत फळबाग केलेली आहे. पाण्यासाठी एक विहीर व बोअरवेल आहे. पिकांना पाणी देण्यासाठी गोकुळ घोरतळे यांनी विहिरीत ३ एच.पी.ची १ पाणबुडी मोटार, १ सिंगल फेज मोटार व बोअरवेलमध्ये थ्री-फेज मोटार अशा तीन मोटारी बसवलेल्या होत्या. रविवारी रात्रीच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी विहीर व बोअरवेलमधील विद्युत मोटारी केबल, पाईपसह गायब केल्या. याचठिकाणी घोरतळे यांचे एक बंद अवस्थेतील कुक्कुटपालन शेड आहे. त्यातील दोन भारा लोखंडी सळ्या, केबल व इतर साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे. रविवारी रात्री राखणदार व्यक्ती नसल्याचा फायदा घेत अंदाजे अर्धा-पाऊण लाखांच्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. सोमवारी (दि. १) सकाळी गोकुळ घोरतळे नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, त्यांना सदरील प्रकार निदर्शनास आला. गायब झालेल्या साहित्याचा त्यांनी जवळपास शोध घेतला. मात्र, एकही वस्तू आढळून आली नाही. याबाबत गोकुळ घोरतळे यांनी शेवगाव पोलीस स्थानकामध्ये फिर्याद दाखल केली आहे.
...
फोटो-०२बोधेगाव चोरी
...
ओळी: बोधेगाव (ता. शेवगाव) येथील गोकुळ काकासाहेब घोरतळे यांच्या शेतातील या विहिरीतील विद्युत मोटारी लंपास करून त्याठिकाणी पडलेले वायररोप व नायलॉन दोरखंड.