नगर तालुक्यात लग्नसोहळे बनले धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:18 IST2021-07-25T04:18:57+5:302021-07-25T04:18:57+5:30

केडगाव : नगर तालुक्यात वाढते लग्न समारंभ व इतर सामूहिक सोहळे चांगलेच धोकादायक ठरत आहेत. ना मास्क ना फिजिकल ...

Wedding ceremonies became dangerous in Nagar taluka | नगर तालुक्यात लग्नसोहळे बनले धोकादायक

नगर तालुक्यात लग्नसोहळे बनले धोकादायक

केडगाव : नगर तालुक्यात वाढते लग्न समारंभ व इतर सामूहिक सोहळे चांगलेच धोकादायक ठरत आहेत. ना मास्क ना फिजिकल डिस्टन्स यामुळे तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. तालुक्यातील ४० गावांत सक्रिय रूग्णांची संख्या २०० झाली असून जुलै मधील रूग्ण संख्या चारशे पार गेली आहे.

लॉकडाऊनचे नियम शिथिल होताच नगर तालुक्यात लग्नांचा धूमधडाका सुरू झाला. याबरोबरच दशक्रिया विधी व इतर समारंभात कुठलेच नियम न पाळता सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढल्याने आता तीच तालुक्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. सामूहिक समारंभात विनामास्क व फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडत असल्याने नगर तालुक्यात कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरूवात केली आहे. तालुक्यातील वाढती रूग्ण संख्या धोक्याची घंटा ठरत आहे.

तालुक्यात जुलै महिन्यात आतापर्यंत ४३३ रुग्ण आढळले. ४० गावांत सध्या २०० सक्रिय रूग्ण झाले आहेत. तालुक्यात आतापर्यंत १ ५ हजार ७७८ इतके रुग्ण आढळले त्यातील १५ हजार २७७ रूग्ण बरे झाले आहेत. या कोरोना महामारीत तालुक्यातील ४०२ जणांचा बळी गेला आहे. लग्न व इतर समारंभात नियम मोडून वाढत असलेली सहभागी लोकांची संख्या हीच वाढत्या रूग्ण संख्येला कारणीभूत ठरत असल्याचे मत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मांडले आहे.

रूई, हिंगणगाव, कापूरवाडी, शेंडी, पिंपळगाव माळवी, सांडवे या गावात सध्या सक्रिय रूग्णांची संख्या दहाच्या वर आहे. बहुतांशी रूग्ण एकाच कुटुंबातील असून लग्न व इतर समारंभात त्यांना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील ६४ गावात सक्रिय रूग्णांची संख्या अजूनही शून्य आहे.

----

रूग्ण संख्या वाढणारी गावे..

वडारवाडी, मेहेकरी, सोनेवाडी, बाराबाभळी, बुऱ्हाणनगर, कापूरवाडी, जेऊर, इमामपूर, पोखर्डी, शेंडी, पिंपळगाव माळवी, ससेवाडी, चास, भोयरे पठार, भोयरे खुर्द, अकोळनेर, चिंचोडी पाटील, दरेवाडी, सांडवे, दशमीगव्हाण, टाकळी काझी, मदडगाव, उक्कडगाव, वाळकी, अरणगाव, खडकी, वडगाव गुप्ता, नवनागापूर, रूई, मठपिंप्री, साकत, वाळुंज, तांदळी, टाकळी, हिंगणगाव, नेप्ती, निमगाव वाघा, निंबळक.

----

५७ हजार जणांचे लसीकरण

तालुक्यात आतापर्यंत ५७ हजार ३१९ जणांचे लसीकरण पूर्ण झाले. यातील ४५ हजार २१८ जणांनी पहिला तर १२ हजार १०१ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. चास, जेऊर, वाळकी, टाकळी खातगाव, रूई या आरोग्य केंद्रात सर्वाधिक लसीकरण झाले.

---

समारंभामध्ये कोरोनाचे नियम पाळत नाहीत. त्यामुळे संसर्ग वाढत आहे. नवरदेव पाॅझिटिव्ह निघाला की वऱ्हाड, मित्र मंडळीही कोरोना बाधित निघतात. सर्दी, खोकला झाला तर लगेच तपासणी करून विलगीकरणात राहणे गरजेचे आहे.

-अनिल ससाणे,

वैद्यकीय अधिकारी, नगर तालुका

Web Title: Wedding ceremonies became dangerous in Nagar taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.