फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले, जास्त पावसाच्या समावेशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मुकले पीक विम्याला अशा मथळ्याखाली लोकमत ने ४ जून रोजी राज्य सरकारचे लक्ष वेधले होते.
सरकारने वादळ, वारा, जास्त पाऊस, आर्द्रता यामुळे फळबागांच्या होणाऱ्या नुकसान पासून शेतकऱ्यांना संरक्षण व्हावे यासाठी हवामान आधारित फळबाग विमा योजना आणली आहे. कमी पाऊस, पावसातील खंड, आठवड्यातील जास्त पाऊस या ट्रिगरचा समावेश असल्यामुळे २०१९-२०२० पर्यंत कमी पाऊस असलेल्या भागातील शेतकऱ्यांना नुकसान झाल्याने या फळपीक विमा योजनेतून चांगले परतावे मिळाले होते. मात्र गेल्या वर्षी राज्य सरकारने या निकषांमध्ये बदल केले. कमी पाऊस, पावसातील खंड, आठवड्याचा सरासरी पाऊस हे निकष कमी करून केवळ जास्त पाऊस व आर्द्रता हे निकष टाकले. यातून डाळिंबाच्या किमान विमा परताव्यासाठी सलग पाच दिवस प्रतिदिन २५ मिमी पाऊस तर पेरूसाठी सलग चार दिवस ५० मिमी पाऊस नोंदला जाणे आवश्यक होता. मात्र कमी पावसाच्या भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात सलग पाऊस पडणे शक्य नसल्याने गेल्या वर्षीचे फळबागांचे मोठे नुकसान होऊन ही विम्याचे परतावे मिळाले नाही. फळबागांच्या विम्याचा प्रती एकरी विमा हप्ता मोठा आहे.
चुकीच्या निकषामुळे शेतकरी नुकसान होऊन ही विमा मिळविण्यास पात्र होत नव्हते .त्यामुळे सरकारने या क्लिष्ट व विमा कंपनी धार्जीने निकषांमध्ये बदल करून २०१९ पूर्वीचे निकष लागू करावेत,अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत होती. याबाबत ‘लोकमत’ वेळोवेळी शेतकऱ्यांची ही भूमिका मांडली होती. त्याची दखल घेत राज्य सरकारने सध्याची हवामान आधारित फळपीक विमा योजना रद्द केली असून ऑनलाईन विमा पोर्टलही बंद केले आहे.
...............
२०२० ते २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी जे निकष होते ते निकष सरकारने परिपत्रक काढून रद्द केले असले तरी नवीन निकषांचे परिपत्रक अद्याप आलेले नाही. लवकरच नवीन निकष असलेली फळपीक विमा योजना जाहीर होईल.
- बापूसाहेब शिंदे, तालुका कृषी अधिकारी,राहाता
180621\185182b.jpg
"फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले,जास्त पावसाच्या सामावेशामुळे अहमदनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक मुकले पीक विम्याला" या मथळ्याखाली ४ जून रोजीच्या "लोकमत"मधील वृत्ताने सरकारचे लक्ष वेधले होते.