कर्नाटक व महाराष्ट्र शासनाच्या योग्य समन्वयामुळेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती रोखण्यात यश आले. याबद्दल शिरोळ तालुक्याच्या वतीने राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा माजी आमदार उल्हास पाटील, धनाजीराव जगदाळे यांनी आभार व्यक्त करत संगमनेर येथे सत्कार केला.
यावेळी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, अलमट्टी आणि हिप्परगी धरणातून वेळीच विसर्ग होण्यासाठी शासनाने प्रयत्न केले. अलमट्टी बरोबरच हिप्परगीचे कारण शासनाच्या लक्षात आल्याने विसर्गावर विशेष लक्ष दिले गेले. त्यामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूर टळू शकला. यापुढेही महाराष्ट्र शासन समन्वयाची भूमिका ठेऊन महापूर टाळण्यासाठी प्रयत्नशील असेल अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.
माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून महापूरप्रश्नी आम्ही निवेदन दिले. याची वेळीच दखल घेऊन मंत्रालयात झालेल्या विशेष बैठकीत महापुराच्या कारणांची वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली. अलमट्टी व हिप्परगी धरणातून विसर्ग होण्यासाठी शासनाने समन्वय राखल्याने पूरस्थिती रोखता आली. मंत्री विखे पाटील यांनी स्वतः याप्रश्नी लक्ष दिल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील जनतेला दिलासा मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, नृसिंहवाडीचे माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, आबासाहेब थोरात, दिलीपराव शिंदे, पृथ्वीराज थोरात आदी उपस्थित होते.