कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग झाला सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST2021-07-16T04:15:44+5:302021-07-16T04:15:44+5:30
राजूर : राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. वन्यजीव विभागाने निसर्गाच्या ...

कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग झाला सुकर
राजूर : राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे. वन्यजीव विभागाने निसर्गाच्या सान्निध्यातून पांजरेमार्गे शिखरावर जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केला. यामुळे कळसूबाई शिखरावर जाणाऱ्या पर्यटकांना नवीन पर्यायी मार्ग मिळाला आहे. त्यामुळे पांजरे येथील स्थानिकांच्या रोजगारात वाढ होणार आहे. यामुळे पर्यटकांना आणि भाविकांना हा पर्यायी मार्ग सुखकर ठरणार आहे.
दरवर्षी नवरात्र उत्सवात कळसूबाई शिखरावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. अनेकवेळा गिर्यारोहक, पर्यटकही शिखरावर गर्दी करत असतात. आजपर्यंत शिखरावर जाण्यासाठी बारी गावातून एकमेव रस्ता होता. हा रस्ता तीव्र उताराचा असल्याने पर्यटकांना आणि भाविकांना कसरत करावी लागत असते. नवरात्र उत्सवात या रस्त्यावर बनविण्यात आलेल्या शिड्यांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यातून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही गर्दी कमी होण्यासाठी वन्यजीव विभागाचे सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी मार्ग शोधला. पांजरे येथील वनरक्षक संजय गिते यांना हा मार्ग सुचवला. गिते यांनी सहायक वनसंरक्षक रणदिवे यांना बरोबर घेत पर्यायी मार्ग शोधला. रणदिवे, कळसूबाई भंडारदरा अभयारण्याचे वनक्षेत्रपाल अमोल आडे यांनी ही कल्पना मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर यांना सुचवली. त्यांनीही कामास होकार दिला. अवघ्या दीड महिन्यात जिल्हा वार्षिक योजनेतून अवघड ठिकाणी शिड्या आणि रीलिंग बनवून ग्रामस्थांच्या मदतीने हा नवीन रस्ता पूर्ण झाला.
......................
बारी येथून चार किलोमीटर अंतरावर कळसूबाई शिखर आहे. ही पायवाट तीव्र उताराची आहे. त्यामुळे पर्यटकांना चढण्यासाठी त्रास होत असतो. पर्यायी तयार करण्यात आलेल्या पांजरे रस्त्यावर अनेक धबधब्यांचा आनंद पर्यटकांना आकर्षित करेल. मुख्य वनसंरक्षक अनिल अंजनकर, सहायक वनसंरक्षक रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली वन्यजीव विभाग, पांजरे ग्रामस्थांच्या सहकार्याने हा रस्ता लवकर पूर्ण करता आला.
- अमोल आडे, वनक्षेत्रपाल, कळसूबाई-भंडारदरा, अभयारण्य विभाग.