कर्जतमध्ये मुली उतरल्या रस्त्यावर
By Admin | Updated: July 20, 2016 00:24 IST2016-07-19T23:48:14+5:302016-07-20T00:24:58+5:30
कर्जत : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २ हजार विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला.

कर्जतमध्ये मुली उतरल्या रस्त्यावर
कर्जत : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी कर्जतमध्ये विविध शैक्षणिक संस्थांमधील सुमारे २ हजार विद्यार्थिनींनी रस्त्यावर उतरून मूक मोर्चा काढला.
या विद्यार्थिनींनी तहसीलदार किरण सावंत यांना निवेदन दिले. घटनेचा निषेध व मृत विद्यार्थिनीस श्रद्धांजली वाहण्यासाठी हा मूकमोर्चा काढला. त्याचे कर्जत तहसीलसमोर सभेत रूपांतर झाले. यावेळी अनेक विद्यार्थिनींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कर्जत तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या या मूक मोर्चात कन्या विद्यालय, महात्मा गांधी विद्यालय, समर्थ विद्यालय, अमरनाथ विद्यालय, दादा पाटील महाविद्यालय, सद्गुरू कन्या विद्यालय, डायनामिक, रवीशंकर प्रशाला, स्टार अकादमी अशा विविध शाळांमधील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या. जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका मीनाक्षी साळुंके, नगरसेवक सचिन घुले, माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सपकाळ, मुख्याध्यापक युसूफ शेख, चंद्रकांत राऊत, मंदा धगाटे, रेखा शेटे, सानिका पवार आदींनी मनोगत व्यक्त केले. नाना सुद्रिक, राम पाटील, ऋषिकेश धांडे,सहायक पोलीस निरीक्षक अजित चिंतले आदी हजर होते. (तालुका प्रतिनिधी)
कर्जत, राशीन, मिरजगाव, येथे रोडरोमिओंना आळा घालावा, आरोपींना भरचौकात फाशी द्यावी, त्रास देणाऱ्या रोडरोमिओंना जागेवरच शिक्षा द्यावी, कर्जत बसस्थानक तसेच रस्त्यावर पोलीस कर्मचारी नेमावेत, आयुष्याची स्वप्ने उधळणाऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, पुन्हा अशी वेळ कोणावर येऊ नये, यासाठी मुलींनी स्वसंरक्षणास तयार रहावे, मुलींसाठी स्वतंत्र एस. टी. बस सुरू करावी, बसची संख्या वाढवावी, मुलींच्या संरक्षणाचे कायदे कडक करावेत, अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालावा, पालकांनीही मुलींप्रमाणेच मुलांवरही बंधने घालावीत, निर्भयाचे हाल केले, तसे आरोपीचे अवयव तोडून त्यांना मारा तेव्हाच खरी श्रद्धांजली ठरेल, अशा संतप्त भावना यावेळी विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या.
पारनेर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील घटना खूपच क्लेशदायक व मानवतेला कलंक लावणारी आहे. लोणी मावळाची घटना ताजी असतानाच पुन्हा अशी घटना घडावी याचे अत्यंत दु:ख होते. ज्या लोकांनी हे दुष्कृत्य केले त्यांना अत्यंत कठोर फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून अशा नराधमांना जरब बसू शकेल. त्यासाठी शासनाने प्राधान्याने शक्य ते सर्व प्रयत्न करावेत, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली.
४उज्ज्वल निकम यांनी विशेष सरकारी वकील म्हणून हा खटला चालविण्याची तयारी दर्शविल्याचे समजले. ही बाब निश्चितच चांगली आहे. अलिकडील काळात मानवतेच्या नावाखाली काही लोक फाशीच्या शिक्षेला विरोध करतात. परंतु जेव्हा मानवतेला काळिमा फासणाऱ्या अशा घटना घडतात त्यातील पाशवी प्रवृत्तीला दया दाखविण्यात काहीच अर्थ नाही. म्हणून कोपर्डी प्रकरणाचा खटला द्रुतगती न्यायालयात चालविण्यात यावा आणि या दुर्दैवी घटनेतील आरोपींना लवकरात लवकर फाशीचीच शिक्षा व्हावी. जेणेकरून पुढील काळात अशा प्रकारचे कृत्य करण्यास कुणी धजावणार नाही. समाजात महिला आणि मुलींची सुरक्षितता हा दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत आहे. यासाठी सरकार, पोलीस यंत्रणा आणि समाजाने अधिक दक्ष रहायला हवे.
४जेणेकरून अशा घटना घडणार नाहीत. तसेच अशा घटना घडल्यानंतर त्यावर वादविवाद न करता त्याकडे मानवतेच्या दृष्टिकोनातून पहायला हवे आणि पीडित कुटुंबाला सामाजिक आधार द्यायला हवा, असेही अण्णा हजारे यांनी सांगितले.