कुकडीच्या पाण्यासाठी आमदार जगताप यांचा कालव्यातच ठिय्या
By Admin | Updated: April 28, 2017 15:57 IST2017-04-28T15:57:24+5:302017-04-28T15:57:24+5:30
कुकडीच्या आवर्तनातून श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना पाणी द्या, या मागणीसाठी आमदार राहुल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले़
कुकडीच्या पाण्यासाठी आमदार जगताप यांचा कालव्यातच ठिय्या
आॅनलाइन लोकमत
श्रीगोंदा (अहमदनगर), दि़ २८ - कुकडीच्या आवर्तनातून श्रीगोंदा तालुक्यातील फळबागांना पाणी द्या, या मागणीसाठी आमदार राहुल जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांनी गुरुवारपासून कालव्यातच ठिय्या आंदोलन सुरु केले़ शुक्रवारीही हे आंदोलन सुरुच होते़
कुकडीचे पाणी विसापूर तलावापर्यंत आले आहे़ आ़ राहुल जगताप यांनी मोहरवाडी तलावाच्या गेट जवळ कालव्यात बसले आहेत़ त्यामुळे टेलकडे पाणी कसे काढावे, असा प्रश्न प्रशासनापुढे उभा राहिला आहे़
विसापूरचे आवर्तन फळबागांना तातडीने सोडावे, म्हणून विसापूर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची शुक्रवारी दुपारी बैठक झाली़ या बैठकीत शनिवारी विसापूर लाभक्षेत्रातील बेलवंडी, घारगाव, लोणीव्यंकनाथ, खरातवाडी, चिंभळे, शिरसगाव, बोडखा पिसोरे ही गावे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ आ़ जगताप यांना अटक झाल्यास रास्ता रोको आंदोलन करणार आहे, असे आण्णासाहेब शेलार व बाळासाहेब नाहाटा यांनी सांगितले़
गायकवाड यांना नोटीस
श्रीगोंद्यात आल्यानंतर पालकमंत्री प्रा़ राम शिंदे यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा देणारे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ऋषीकेश गायकवाड यांना श्रीगोंदा पोलिसांनी प्रतिबंधक नोटीस बजावली आहे़
कुकडीचे कार्यकारी अभियंता सुभाष कोळी हे दिवसभर विसापूर परिसरात तळ ठोकून होते तर पोलिस निरीक्षक सचिन वागंडे, पोलिसांचे पथक आ़ जगताप यांच्या आंदोलनावर लक्ष ठेवून आहेत़