पाणीपट्टी करात दुप्पट वाढ
By Admin | Updated: March 4, 2016 00:02 IST2016-03-03T23:56:53+5:302016-03-04T00:02:11+5:30
अहमदनगर : महापालिका प्रशासनाने सुरूवातीच्या शिलकेसह २०१६-१७ या वर्षासाठी ७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करताना पाणी पुरवठा करात दुप्पट वाढ प्रस्तावित केली आहे.

पाणीपट्टी करात दुप्पट वाढ
अहमदनगर : महापालिका प्रशासनाने सुरूवातीच्या शिलकेसह २०१६-१७ या वर्षासाठी ७३३ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प स्थायी समितीला सादर करताना पाणी पुरवठा करात दुप्पट वाढ प्रस्तावित केली आहे. अर्थसंकल्पात ७२५ कोटी रुपयांचा खर्च दाखविण्यात आला असून ८ कोटी रुपयांची शिल्लक दाखविण्यात आली आहे. स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा पाच दिवसांसाठी तहकूब करण्यात आली आहे. बुधवार (दि.९) पासून स्थायी समितीत अर्थसंकल्पावर चर्चा होणार आहे.
सभापती गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची अर्थसंकल्पीय सभा गुरूवारी सुरू झाली. या सभेत आयुक्त विलास ढगे यांनी भोसले यांना २०१६-१७ चा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात २७६ कोटी रुपये महसुली जमा तर २०१ कोटी रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. भांडवली जमा ४२७ कोटी रुपये तर खर्च ५०३ कोटी रुपये आहे. सुरूवातीच्या शिलकेसह ७३३ कोटी रुपयांच्या प्रस्तावित अर्थसंकल्पात ७२५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून ८ कोटी ३८ लाख रुपये शिलक्क दाखविण्यात आले आहेत.
बेघर नागरिकांसाठी रात्र निवारा केंद्र उभारण्याचा मानस अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. रस्ते, चौक सुशोभिकरणाचे काम सामाजिक संस्था, उद्योजक, दानशूर व्यक्तींच्या सहयोगातून केले जाणार आहे. महिलांसाठी सार्वजनिक स्वच्छतागृह निर्माण केले जाणार आहे. कचरा मुक्त शहर अशी घोषणाही आयुक्त ढगे यांनी केली आहे.
महापालिका क्षेत्रात अग्निशमन कर आकारण्याचा प्रस्तावही प्रशासनाने सादर केला आहे. प्रत्येक कर मूल्यांचे २ टक्के अग्निशमन कर २०१६-१७ आर्थिक वर्षापासून लागू करण्याचे या प्रस्तावात म्हटले आहे. पूर्वी असा कर महापालिका क्षेत्रात आकारला जात नव्हता. (प्रतिनिधी)