पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत, नागरिक त्रस्त
By Admin | Updated: June 11, 2014 00:18 IST2014-06-10T23:45:20+5:302014-06-11T00:18:44+5:30
अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा वादळी वाऱ्याने खंडीत झाला.
पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत, नागरिक त्रस्त
अहमदनगर : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा वीज पुरवठा वादळी वाऱ्याने खंडीत झाला. १४ तास वीज पुरवठा खंडीत असल्याने सुरळीत होऊ घातलेला पुरवठा पुन्हा एकदा विस्कळीत झाला. दुपारी तीन नंतर पाणी पुरवठा सुरळीत सुरू होण्यास सुरूवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
३ जूनपासून शहरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळामुळे पाणी योजनेचा वीज पुरवठा तेव्हापासूनच खंडीत होण्यास प्रारंभ झाला. ७ जूनपर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरू होता. ८ तारखेला वीज पुरवठा सुरळीत होऊन पाणी पुरवठा पूर्ववत झाला होता. ९ तारखेला रात्री पुन्हा जोरदार वादळी पाऊस झाला. त्यात मुळानगर व वसंत टेकडी येथील वीज पुरवठा खंडीत झाला. वादळाने झाडे वीजवाहक तारांवर पडली. सोमवारी रात्री ७ वाजता खंडीत झालेला वीज पुरवठा मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजता सुरळीत झाला. त्यानंतर मुळानगर येथील पंप सुरू झाले. दुपारी दोन वाजता वसंत टेकडी येथील साठवण टाकीत पाणी पडण्यास सुरूवात झाली.
दुपारी तीन वाजता वसंत टेकडीचा वीज पुरवठा सुरू झाला. त्यानंतर प्राथमिक गरज असलेल्या भागांना पाणी सोडण्यास सुरूवात झाली. (प्रतिनिधी)
वीज वितरण कंपनीचे कर्मचारी व महापालिकेचे कर्मचारी संयुक्तपणे खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यासाठी झटत होते. वीज वाहक खांब वाकल्याने त्यावरून तारा ओढणे कठीण होते. त्यामुळे काही ठिकाणी बायपास करून तारा ओढण्यात आल्या. त्यानंतरच वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला.