नगरमधील १० हजार विद्यार्थांच्या अभ्यासावर पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:21 IST2021-04-22T04:21:56+5:302021-04-22T04:21:56+5:30

केडगाव : दहावीच्या बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी कोरोनाच्या कठीण काळातही रात्रंदिवस अभ्यास केला. आता परीक्षेचे दिवस जवळ येत ...

Water on the study of 10,000 students in the city | नगरमधील १० हजार विद्यार्थांच्या अभ्यासावर पाणी

नगरमधील १० हजार विद्यार्थांच्या अभ्यासावर पाणी

केडगाव : दहावीच्या बोर्ड परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी कोरोनाच्या कठीण काळातही रात्रंदिवस अभ्यास केला. आता परीक्षेचे दिवस जवळ येत असतानाच परीक्षा रद्दचा निर्णय झाला. नगर शहर व तालुक्यातील १० हजार विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर पाणी पडले. हुशार विद्यार्थी तर या निर्णयाने चांगलेच हिरमुसले आहेत.

२०२०- २०२१ हे शैक्षणिक वर्षच कोरोनाच्या भयावह सावटाखाली सुरू झाले. १५ जूनला शाळा सुरू होत असतात. मात्र कोरोनामुळे १० वी च्या प्रत्यक्ष शाळा २६ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र शाळांमधून विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये व अभ्यास कमी पडू नये म्हणून ऑनलाईन तासिका, यु ट्यूब व्हिडिओ, पीडीएफ फाईलमार्फत अभ्यास सुरू होता. कोरोनाचा कठीण काळ असतानाही बहुतांशी शाळांनी दहावीच्या मुलांची बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने तयारी करून घेतली. शाळांनी ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने सराव परीक्षा घेऊन मुलांची तयारी करून घेतली होती. २९ एप्रिलपासून मुलांची बोर्डाची परीक्षा प्रत्यक्ष सुरू होणार होती. त्याचे वेळापत्रक बोर्डाने जाहीर केले होते. मुले परीक्षांची तयारी करीत असतानाच दहावीची बोर्ड परीक्षा रद्द झाल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

यामुळे हुशार विद्यार्थी चांगलेच हिरमुसले आहेत.

---

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सद्य परिस्थिती लक्षात घेऊन दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मात्र या मुलांचे पुढील मूल्यांकन कसे असणार याबाबत लवकरच शिक्षण विभागाचे मार्गदर्शक तत्त्व जाहीर होतील. त्यानुसार जिल्ह्यात पुढील मूल्यमापनाचे नियोजन होईल.

-रामदास हराळ,

शिक्षणाधिकारी, माध्यमिक

--

दहावीच्या परीक्षा झाल्या पाहिजे होत्या. गेली वर्षभर कोरोनाचा दबाव असूनही ऑनलाईन क्लास, शाळा करून परीक्षेची तयारी केली होती. शासनाने परीक्षा न घेण्याचा घेतलेला निर्णय विद्यार्थ्यांवर अन्यायकारक आहे. उशिरा का होईना परीक्षा झाल्या तर आम्हाला आमच्या क्षमतेची योग्य जाणीव झाली असती. पुढे कोणत्या शाखेला जायचे यांचा अंदाज आला असता.

-प्रसन्न ठोंबरे,

विद्यार्थी, दहावी

--

दहावीच्या परीक्षेत अव्वल येणार या दृष्टीने वर्षभर अभ्यास केला. माझ्या अभ्यासासाठी आई-वडिलांनी खूप प्रयत्न केले. अभ्यास पूर्ण झाला होता. चांगले गुण मिळवून चांगल्या ठिकाणी प्रवेश करण्याची जिद्द आहे. मात्र आता पुढे मूल्यमापन कसे होणार यावरच आमचे भवितव्य आहे. परीक्षा न झाल्याने मनाला हुरहुर लागली.

-आरती वाकरे,

विद्यार्थिनी, दहावी

--

दहावीची परीक्षा रद्द झाली. मात्र अनेक प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. पुढील मूल्यमापन कसे होणार हे अद्याप जाहीर झाले नाही. दहावीचा टप्पा मुलांसाठी महत्त्वाचा होता. परीक्षेत चांगले गुण मिळवण्याच्या इर्षेने मुले अभ्यास करतात. उशिरा का होईना परंतु परीक्षा घ्यायला हव्या होत्या.

-सुनील पंडित ,

अध्यक्ष , मुख्याध्यापक महासंघ

Web Title: Water on the study of 10,000 students in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.