दिल्लीगेटमधील दुकानांमध्ये घुसले पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:26 IST2021-08-19T04:26:25+5:302021-08-19T04:26:25+5:30
अहमदनगर : कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील दिल्लीगेट परिसरात पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. पावसाचे पाणी ...

दिल्लीगेटमधील दुकानांमध्ये घुसले पाणी
अहमदनगर : कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील दिल्लीगेट परिसरात पावसाच्या साठणाऱ्या पाण्याचा प्रश्न अद्यापही मार्गी लागलेला नाही. पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर साचत असून, ते तळघरातील अनेक दुकानांमध्ये घुसून नुकसान होत आहे. त्यामुळे दुकानदारांनी साचलेल्या पाण्याचे पूजन करून व मेणबत्ती पेटवून महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
दोन दिवसांपासून शहरात पाऊस सुरू आहे. या पावसामुळे दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले. रस्त्यावरील खड्डेही पाण्याने तुडुंब भरले. हे साचलेले पाणी अनेक दुकानांमध्ये घुसले. खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने अनेक वाहनचालक खड्ड्यात पडले आहेत. या सर्व परिस्थितीला महापालिकेचा गलथान कारभारच कारणीभूत ठरत आहे. दिल्लीगेट ते सिद्धीबाग ते न्यू आर्ट्स कॉलेज या रस्त्याचे डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झालेले आहे. परंतु ड्रेनेजची कामे अर्धवट आहेत. सर्जेपुरातील खोकर नाल्यातून वाहून येणारे पाणी दिल्लीगेट परिसरात साचते. निधी असूनही येथील ड्रेनेजचे काम अर्धवट आहे. तर सिद्धीबाग ते न्यू आर्टस् कॉलेजपर्यंत काँक्रीटीकरण झाले. परंतु गटारीचे चेंबर काढण्यात आले नाहीत. तेथेही अर्धवट कामे आहेत. या अर्धवट कामामुळे दिल्लीगेट परिसरात रस्त्यावर पावसाचे मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहते. पाणी वाढले की ते दुकानांमध्ये घुसते. या पावसाच्या पाण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून ‘जैसे थे’ च आहे. या आंदोलनात सारंग पंधाडे, समीर पठाण, बंटी कदम, प्रदीप पाचारणे, महेश गुंजाळ, रामेश्वर चव्हाण, बद्रीनाथ महाजन, रमेश सिसोदिया, सत्यनारायण पाखुंटी, सलमान शेख, एस. आर. बागवान, परवेज शेख, अब्दुल शेख, चेतन जॉनी आदी उपस्थित होते.
-------
फोटो- १८दिल्लीगेट
अहमदनगर शहरातील दिल्लीगेट परिसरात पावसाचे पाणी तळघरातील दुकानांमध्ये शिरले. त्यामुळे अनेक दुकानदारांचे मोठे नुकसान झाले. साचलेल्या पाण्याचे पूजन करून दुकानदारांनी मेणबत्त्या पेटविल्या.