आदिवासींच्या पालात पिंपळगाव तलावाचे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:25 IST2021-09-14T04:25:42+5:302021-09-14T04:25:42+5:30
केडगाव : पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने लगतच राहणाऱ्या आदिवासींच्या पालांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे झोळी बांधून ...

आदिवासींच्या पालात पिंपळगाव तलावाचे पाणी
केडगाव : पिंपळगाव माळवी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने लगतच राहणाऱ्या आदिवासींच्या पालांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. त्यामुळे झोळी बांधून चिमुकल्यांना झोपविण्याची वेळ आली आहे. अशारितीने जगण्यासाठीचा त्यांचा संघर्ष सुरूच आहे.
पिंपळगाव तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलाव परिसरात २०० ते ३०० आदिवासी भिल्ल समाजाचे कुटुंब वास्तव्याला आहेत. तलाव भरल्यानंतर बहुसंख्य आदिवासींच्या पालामध्ये पाणी घुसले आहे. त्यामुळे येथील आदिवासींची तसेच चिमुरड्यांची जगण्यासाठी धडपड सुरु असल्याचे विदारक चित्र पिंपळगाव तलावात पाहावयास मिळते. तलावामध्ये आदिवासी समाज मासेमारी करून उपजीविका भागवत आहे. अनेक वर्षांपासून आदिवासी समाज येथे वास्तव्याला आहे. महादजी शिंदे सरकारच्या काळात येथील भिल्ल समाजाच्या बंडाची इतिहासात नोंद आहे. तलावाचे क्षेत्र शिंदे सरकारच्या नावावर होते. आता त्या क्षेत्रावर महानगरपालिकेच्या नावाची नोंद झाली आहे. येथील आदिवासी समाज अनेक वर्षांपासून सरकार दरबारी या क्षेत्रावर आदिवासींच्या नावाची नोंद व्हावी म्हणून लढा देत आहे.
जागा नावावर नसल्याने येथील समाजाला शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळत नाही. सद्यस्थितीत तलावातील बहुतांशी आदिवासींचे पालं पाण्यामध्ये आहेत. चिमुरड्यांसह त्या परिस्थितीत राहण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. सीना व खारोळी नदीच्या महापुरामुळे अनेक साप वाहून आले असून, त्यांचे वास्तव्य आदिवासींच्या पालाशेजारीच असल्याचे दिसून येते.
----
पिंपळगाव तलावातील आदिवासींचे वास्तव्य हे अतिक्रमणात आहे. तरीदेखील प्रशासनाच्यावतीने परिस्थितीची तत्काळ पाहणी करून सद्यस्थितीत त्यांच्यासाठी काय करता येईल, याचा निर्णय घेऊ.
- उमेश पाटील
तहसीलदार, नगर
---
हद्दीचा वाद कायम
येथील आदिवासी राहण्यासाठी जेऊर हद्दीत आहेत तर त्यांची मतदार यादीत नावे पिंपळगाव माळवी गावामध्ये आहेत. त्यामुळे आम्हाला अनेक अडचणी येत असल्याचे आदिवासी समाजाकडून सांगण्यात येत आहे. आम्हाला जातीचे दाखले तसेच प्रशासनाच्या इतर योजनांचा लाभ मिळावा, अशी मागणी आदिवासी समाजाकडून करण्यात येत आहे.
-----
१३ पिंपळगाव माळवी
आदिवासींच्या घरांमध्ये पिंपळगाव माळवी तलावाचे पाणी घुसले आहे.