पंधरा दिवसांतून एकदाच पाणी; संतप्त नागरिकांनी आयुक्तासमोर मांडली व्यथा
By अरुण वाघमोडे | Updated: May 24, 2023 18:08 IST2023-05-24T18:08:38+5:302023-05-24T18:08:52+5:30
कल्याण रोड परिसरात ज्यांना महापालिकेचे नळ कनेक्शन नाही, अशा नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

पंधरा दिवसांतून एकदाच पाणी; संतप्त नागरिकांनी आयुक्तासमोर मांडली व्यथा
अहमदनगर: शहरातील कल्याण रोडवरील प्रभाग क्रमांक पंधरामध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. येथे महापालिकेची जलवाहिनी नाही तसेच टँकरनेही पंधरा ते सतरा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत असल्याची व्यथा या परिसरातील नागरिकांनी बधुवारी मनपा आयुक्तांसमोर मांडली. पाण्याबाबत विचारणार केल्यानंतर महिलांशी उद्धटपणे बोलणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी यावेळी नागरिकांनी केली.
कल्याण रोड परिसरात ज्यांना महापालिकेचे नळ कनेक्शन नाही, अशा नागरिकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र उन्हाळ्यात या भागातपंधरा दिवसांनी टँकर येत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. महापालिकेकडून टँकर वाटपासाठी नियुक्त करण्यात आलेला कर्मचाऱ्याला टँकरसाठी फोन लावल्यास तो फोन उचलत नाही. फोन उचलल्यास नागरिक व महिलांशी अतिशय उद्धटपणे बोलतो. या भागात पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
या परिसरात पाणी टँकर वाटपाचे योग्य नियोजन करावे, चार ते पाच दिवसांनी टँकर उपलब्ध करुन द्यावा, अन्यथा महापालिकेवर जनआक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदन देतेवेळी नगरसेवक अनिल शिंदे, खासेराव शितोळे, पारुनाथ ढोकळे, भगवान काटे, विजय गाडळकर, एकनाथ व्यवहारे, ओंकार शिंदे, बाळासाहेब ठुबे लक्ष्मण पोरे,रिंकू शहाणे, संगीता लाटे, मंगल लाटे, लता कुलकर्णी, अर्चना निकम, संदीप सोनवणे, ऋषिकेश चिंधाडे, आदी उपस्थित होते.