तोंडचे पाणी पळाले
By Admin | Updated: June 28, 2014 01:13 IST2014-06-27T23:41:36+5:302014-06-28T01:13:03+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने हूल दिल्याने दुष्काळाची चाहूल लागली आहे. टँकरची संख्या ३०१ वर गेली आहे. धरणेही खपाटीला चालल्याने जलसंकट समोर ठाकले आहे.
तोंडचे पाणी पळाले
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाने हूल दिल्याने दुष्काळाची चाहूल लागली आहे. टँकरची संख्या ३०१ वर गेली आहे. धरणेही खपाटीला चालल्याने जलसंकट समोर ठाकले आहे. जिल्हा प्रशासनाला आपत्कालीन आराखडा तयार करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहायता निधी पाणीटंचाईवर खर्च करण्याचा आदेश दिला आहे.
जिल्ह्यातील तब्बल २३५ गावे, १ हजार ७१ वाड्या-वस्त्यांवरील ५ लाख २८ हजार ३८७ लोकसंख्या टँकरच्या पाण्यावर तहान भागवित आहे. आठवड्यात पाऊस न झाल्यास टंचाईची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुधन अडचणीत आले आहे.
दक्षिणेत कर्जत,जामखेड, पाथर्डी, शेवगाव, पारनेर, नगर तालुक्यांमध्ये तर उत्तरेत संगमनेर, अकोले तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकर आहेत. श्रीरामपूर आणि राहुरी तालुक्यात एकही टँकर नाही. मात्र, तेथेही टंचाई जाणवू लागली आहे. श्रीरामपूरमधील बेलापूर बुद्रूक येथील साठवण तलावातील पाणी संपल्याने टंचाई निर्माण झाली आहे. श्रीरामपूर शहराचाही प्रश्न गंभीर बनू शकतो. त्यामुळे भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्याची मागणी आमदार भाऊसाहेब कांबळे, मा.आ. जयंत ससाणे यांनी केली आहे. १५ जुलैला आवर्तन सोडण्याबाबत जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.
राज्यातील टंचाईग्रस्त जिल्ह्यांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला. त्यात जिल्हाधिकाऱ्यांना आपत्कालीन आराखडा तयार करण्याचा आदेश दिला आहे. पाणी पुरवठा योजना, सिमेट नाला बंधाऱ्यांच्या निधीसाठी तातडीने तसे प्रस्ताव तयार करून मुख्य सचिवांकडे सादर करावे. खासगी तसेच सरकारी पाणीसाठे आरक्षित करा. आगामी जलसंकटाची शक्यता धरून नियोजन करा. सहायता निधी पाण्यावर खर्च करा, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या आहेत. खरीप पेरणी, जनावरांचा चारा आदींबाबतही माहिती घेतली.
प्रशासन सज्ज
जिल्ह्यात तालुकानिहाय सुरू असलेले टँकर :संगमनेर, अकोले, कोपरगाव, नेवासा ४, राहाता १०, नगर ३४, पारनेर ३४, पाथर्डी ७८, शेवगाव २५, कर्जत ३२, जामखेड १९, श्रीगोंदा ५ यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने प्रत्येक गाव आणि गावाला पाणी पुरवठा करण्याऱ्या योजनेच्या उदभवनिहाय माहिती संकलित करण्याची मोहीम सुरू केली आहे. यात उशीरात उशीरा पाऊस झाल्यास संबंधित गावाला आणि योजनेला किती दिवस पाणी पुरवठा करता येईल, याची माहिती संकलित करणार आहे.
जिल्ह्यात १३६ पाणी योजनांचे काम प्रगतीपथावर सुरू आहे. या ठिकाणी हे काम तातडीने पूर्ण करून घेण्याचे आदेश सरकारकडून देण्यात आले आहे. जेणे करून या ठिकाणी पाण्याचे टँकर बंद करता येतील. यामुळे अपूर्ण असणाऱ्या योजना तातडीने पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शिवशंकर निकम यांनी दिली.
जिल्ह्यात पावसाची सध्या परिस्थिती ही २०१२ प्रमाणे झालेली आहे. त्यावेळी ज्या गावात पाणी टंचाई होती. यंदा देखील तशीच परिस्थिती आहे. यामुळे २०१२ प्रमाणे यंदाही उपाय योजना करण्याचा प्रशासनाचा विचार आहे.
भूगर्भातील पाणी पातळी घटली
अहमदनगर : दरवर्षी पावसाचे घटलेले प्रमाण, बेसुमार वाढलेल्या विहिरींची संख्या, कूपनलिकांचे वाढते प्रमाण आणि भूजल पुनर्भरण कार्यक्रमाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे भूजल पातळी घटली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या पाहणीत जिल्ह्यात सरासरी ८.९१ मीटरने पाणी पातळी घटली आहे. हा निकर्ष रॅडम तपासणीवर आधारित असला तरी जिल्ह्याच्या दृष्टीने घातक आहे.
दरवर्षी वरिष्ठ वैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्यावतीने वर्षातून तीन वेळा भूजल सर्वेक्षणाचे नमुने घेण्यात येतात. यात पावसाळ्यानंतर उन्हाळ्याच्या तोेंडावर आणि पुन्हा शेवटी मे महिन्यात भूजलाचे पातळीचे नमुने घेण्यात येतात. या पाहणीनंतर जिल्ह्यात भूजल पुर्नभरण कार्यक्रमाची दिशा ठरविण्यात येते. ही पध्दत अनेक वर्षापासून सुरू आहे. मात्र, भूजल पातळीत वाढ होण्याऐवजी घट होतांना दिसते.
यंदा जिल्ह्यात १४ तालुक्यात झालेल्या भूजल सर्वेक्षणात २०२ विहिरींचे निरिक्षण करण्यात आले. यात आठ तालुक्यातील पाणी पातळी घटली असल्याचे दिसून आले. मात्र, उर्वरित सहा तालुक्यात भूजल पातळी राखण्यात यश आलेले आहे.
तालुकानिहाय असणारी पाणी पातळी;
सुरूवातीला घट असणारे तालुके
संगमनेर १.०९ ,नगर ०.७५, कोपरगाव १.६७, नेवासा ०.१४, जामखेड ०.४८, कर्जत ०.०३, पारनेर ०.०२, पाथर्डी ०.०६ तर अकोले ०.९४, राहाता ०.६६, राहुरी ०.७४, शेवगाव ०.९५, श्रीगोंदा ०.९६ आणि श्रीरामपूर ०.९३ असा आहे.
वर्षभरापूर्वी ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य अॅड. सुभाष पाटील यांनी जिल्ह्यासाठी मंजूर पाणी योजना, त्यापैकी किती योजनांचे काम पूर्ण झाले, अपूर्ण आहेत याची हिस्ट्रीशिट तयार करण्याची मागणी केली होती.
जिल्ह्यात ४३ प्रादेशिक तर १ हजार ५५४ स्वतंत्र पाणी योजना आहेत. यात अकोले १६९, जामखेड १२२, संगमनेर २१८,नगर ११५, कोपरगाव ९१, नेवासा ६४, कर्जत १२५, पारनेर १७३, पाथर्डी १२०, राहाता ६२, राहुरी ५५, शेवगाव ३४, श्रीगोंदा १३७ आणि श्रीरामपूर ६७ यांचा समावेश आहे.