भंडारदर्‍याच्या देखभाल-दुरूस्तीवर ‘पाणी’

By Admin | Updated: June 26, 2023 16:20 IST2014-05-12T00:36:58+5:302023-06-26T16:20:09+5:30

प्रकाश महाले , शासनाला प्रतिवर्षी सुमारे १६ कोटींहून अधिक महसूल मिळवून देणारे भंडारदरा धरण देखभाल, दुरुस्तीअभावी उपेक्षेच्या गर्तेत सापडले आहे

'Water' on the maintenance of the reservoir | भंडारदर्‍याच्या देखभाल-दुरूस्तीवर ‘पाणी’

भंडारदर्‍याच्या देखभाल-दुरूस्तीवर ‘पाणी’

प्रकाश महाले , राजूर शासनाला प्रतिवर्षी सुमारे १६ कोटींहून अधिक महसूल मिळवून देणारे, तसेच जिल्ह्यातील शेकडो कोटींच्या संपत्तीच्या निर्मितीस सहाय्यभूत ठरलेले भंडारदरा धरण देखभाल, दुरुस्तीअभावी उपेक्षेच्या गर्तेत सापडले आहे. परिणामी धरणातून मोठी गळती सुरू असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. अकोले तालुक्यातील शेंडी (भंडारदरा) या ठिकाणी १९१० ते १९२६ या सोळा वर्षांच्या कालावधीत ५०७ मीटर लांबीचे, ८२.३२ मीटर उंचीचे आणि १२१ चौरस किमी पाणलोट क्षेत्र असणारे भंडारदरा धरण बांधण्यात आले. ११ हजार ३९ दलघफू साठवण क्षमता असणार्‍या या धरणातील पाण्यामुळे उत्तर नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे २३ हजार ७७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले. धरण उभारणीनंतर १९६९ च्या भूकंपात धरणास तडे गेल्याचे निदर्शनास आल्यामुळे धरणाचे मजबुतीकरण करण्यात आले. यात मुख्य धरणास आधार देणे, सांडव्याला वक्र दरवाजे बसविणे, सिमेंट ग्राऊंटिंग करणे आदी कामे १९७२ पर्यंत पूर्ण करण्यात आली. शिवाय १२ मेगावॅट क्षमतेचा भंडारदरा जलविद्युत प्रकल्प क्रमांक १ साठी टनेल विमोचकाचे बांधकामदेखील करण्यात आले. त्यामधून सध्या वीज निर्मितीसाठी पाणी सोडण्यात येते. यानंतर कोदणी येथे ३४ मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. हे दोन्हीही प्रकल्प शासनाने करार करत खासगी कंपनीस चालविण्यास दिले. धरणाचे बांधकाम करताना विशिष्ट पातळीवर पाणी सोडण्यासाठी मोर्‍या बसविण्यात आल्या आहेत. या मोर्‍यांमधून पाणी सोडण्यास बंधन येते म्हणजेच सांडव्याच्या पातळीच्या खाली पाणीपातळी गेल्यानंतर धरणातून महत्तम १ हजार ८०० क्युसेक वेगानेच पाणी सोडता येते. कोदणी येथे उभारण्यात आलेल्या जलविद्युत प्रकल्पास २ हजार ७०० क्युसेक इतका विसर्ग आवश्यक आहे. मात्र पावसाळ्यानंतर यावर बंधन येते व पूर्ण क्षमतेने वीजनिर्मिती होऊ शकत नाही. शंभरी ओलांडलेल्या या धरणावर शासनाने १९७२चा अपवाद वगळता देखभाल दुरुस्तीवर मोठा खर्चच केलेला नाही. त्यामुळे कोट्यवधींचा महसूल मिळवून देणार्‍या भंडारदरा धरणाची व परिसराची अवस्था वाईट होत चालली आहे. धरणाच्या मोर्‍यांमधून सोडण्यात येणार्‍या झडपांचे रॉड गंजलेले आहेत. अनेकवेळा या झडपा उघडणे किंवा बंद करणेही जिकिरीचे ठरत आहे. फाटक उघडण्यासाठी मनुष्यबळाचा वापर करावा लागतो. तंत्रज्ञानाच्या युगात यात बदल अपेक्षित असतानाही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. २१ व्या शतकात अनेक धरणांवर अत्याधुनिक पद्धतीच्या यंत्रणा बसविण्यात आल्या आहेत. मात्र येथे पाणी सोडण्यासाठी वा मोजण्यासाठीच्या यंत्रणा जुनाटच आहे. पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध असणारी धरणाच्या पायथ्याच्या बागेची तसेच धरण माथ्याबरोबरच धरण अंतर्गत रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. धरणास तडे गेल्यानंतर मजबुतीकरण झाले, मात्र पाणी गळतीकडे अक्षम्य दुर्लक्ष झाले. गेल्या बारा वर्षात केवळ फाटक व कमाणी उभारणीचे काम झाले. इतरत्र केवळ मलमपट्टीच सुरू आहे. २००५ मध्ये तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांनी येथे भेट दिल्यानंतर धरणाची दुरावस्था पाहत तात्काळ दुरुस्तीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते. त्यानुसार प्रस्तावही पाठविण्यात आला. यानंतर याच विभागाच्या सचिवांनीही येथे भेट दिली. धरण परिसरात असणार्‍या वर्ग एक क्रमांकांच्या व इतर जलसंपदा विभागाच्या निवासस्थानांचीही दुरावस्था झालेली पाहून त्याची दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश त्यांनीही दिले. मात्र अद्याप यावर काहीही मार्ग निघाल्याचे दिसून येत नाही. या जलसंपत्तीवर उत्तर नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचावले. याबरोबर पीएच वन जलविद्युत प्रकल्पातून वर्षाला साडेतीन कोटींहून अधिक युनिट, तर पीएच दोन मधून साडेपाच कोटी युनिट वीज निर्मिती होऊ लागली. या सर्व माध्यमातून शासनास सुमारे सोळा कोटींहून अधिक महसूल प्रतिवर्षी मिळत असतो. एवढे असतानाही जलसंपदा विभागाकडून या धरणाची देखभाल-दुरुस्ती दुर्लक्षित राहते, ही चिंतेची बाब आहे. प्रायोगिक तत्त्वावर या धरणाच्या ५० फुटांवरील व्हॉल्व्ह बदलविण्यात येणार आहे. त्याची निविदा मंजूर झाली. नवा व्हॉल्व्ह आला. मात्र, आता तो बदलविण्यासही विलंब होत आहे. निळवंडे धरण पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. त्यामुळे या धरणातही पुढे मोठ्या विसर्गाने पाणी सोडणे क्रमप्राप्त ठरणार आहे. त्यामुळे विसर्गाची मर्यादा असणारे भंडारदरा धरणाचे सर्वच व्हॉल्व्ह बदलविणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी) धरण रचना १९१० ते १९२६ दरम्यान बांदकाम पूर्ण. ५०७ मीटर लांब, ८२.३२ मीटर उंच आणि १२१ चौरस किमी पाणलोट क्षेत्र. ११ हजार ३९ दलघफू साठवणक्षमता. नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांचे २३ हजार ७७ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली. १९६९ मध्ये भूकंपामुळे धरणास तडे. १२ व ३४ मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प. व्हॉल्व्हची दुरुस्ती लवकरच देखभाल दुरुस्तीचे प्रस्ताव गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आले असल्याचे सांगत यांत्रिकी विभागाकडे धरणाच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम असून, त्यांच्या मार्फत प्रायोगिक तत्त्वावरील ५० फुटांचा व्हॉल्व्ह बदलविण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने निधी उपलब्धतेनुसार पुढील काम होणार असल्याचे सहाय्यक अभियंता किरण देशमुख व शाखा अभियंता रामनाथ आरोटे यांनी सांगितले.

Web Title: 'Water' on the maintenance of the reservoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.