साखर कारखाने बंद पाडून दारूच्या कारखान्याला पाणी
By Admin | Updated: July 12, 2014 01:10 IST2014-07-11T23:22:14+5:302014-07-12T01:10:25+5:30
अहमदनगर: मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हवे आहे, ते त्यांना दिले पाहिजे. मात्र, आमचे साखर कारखाने बंद पाडायचे आणि त्यांच्या दारूच्या कारखान्यांना पाणी द्यायचे हा कुठला न्याय.

साखर कारखाने बंद पाडून दारूच्या कारखान्याला पाणी
अहमदनगर: मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी हवे आहे, ते त्यांना दिले पाहिजे. मात्र, आमचे साखर कारखाने बंद पाडायचे आणि त्यांच्या दारूच्या कारखान्यांना पाणी द्यायचे हा कुठला न्याय. मुळात राज्याच्या राजकारणात नगरचा प्रभाव कमी झाला असून यामुळे जिल्ह्याचे हक्काचे पाणी पळविले जात आहे. या हक्काच्या पाण्यासाठी राष्ट्रवादीत एकाकीपणे लढत असलो तरी, हा प्रश्न तडीस लावणार असल्याचा विश्वास ज्येष्ठ नेते शंकरराव कोल्हे यांनी व्यक्त केला.
नगर आणि नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीला सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या परिस्थिती बाबत कोल्हे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, ज्येष्ठ संचालक तथा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग उपस्थित होते.
कोल्हे म्हणाले की, चार वर्षापासून नगर, नाशिक विरूध्द मराठवाड्याचा पाण्यावरून वाद सुरू आहे. मुळात जायकवाडी धरणच चुकीचे असून ज्या धरणाची क्षमता २३.७२ टीएमसी असतांना ते १०० टीमएमसी पर्यंत कोणी नेले याचा खुलासा कोणीच करत नाही. २००१ आणि २००८ मध्ये राज्य सरकारच्या रेखांकन विभागाने केलेल्या सर्व्हेत ही माहिती उजेडात आलेली आहे.
जायकवाडी पाणी प्रश्नी उच्च न्यायालय आणि नेमण्यात आलेल्या प्राधिकरणासमोर सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारने गोदावरी खोऱ्यातील जलनियामनासंदर्भात हिरालाल मेंढेगिरी समिती नेमली आहे. या समितीने जायकवाडीला २२. ५ टीएमसी पाणी सोडले पाहिजे असा अहवाल दिला आहे. हा अहवाल स्वीकारल्यास जिल्ह्यातील १४ साखर कारखाने बंद पडतील. या कारखान्यांवर असणारे २८ हजार कामगार आणि २ लाख ऊस तोडणी मजुरांचे काय होणार असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
जायकवाडीत पाणी सोडण्यासाठी मराठवाड्यातील लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. हे पाणी पिण्यासाठी नव्हे, तर दारूच्या कारखान्यांना पाहिजे आहे. यासाठी दारू कारखानदार लॉबी पैसा पुरवत असल्याचा आरोप कोल्हे यांनी
केला. दुसरीकडे गोदावरी मराठवाडा महामंडळ नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या विरोधात काम करत असून अनेक वर्षापासून या महामंडळाचे कार्यालय नाशिक या ठिकाणी हलविण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र, त्याकडेही राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला आहे.(प्रतिनिधी)
विषय मंत्रिमंडळाच्या बैठकीत
जायकवाडी पाणी प्रश्नी मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारला लक्ष द्यावे लागणार आहे. यासाठी जिल्ह्यातील तीन मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याशी या प्रश्नी बोललो असून त्यांनी कॅबिनेटच्या बैठकीत विषय उपस्थित करणार असल्याचे सांगितले आहे. उर्वरित दोन्ही मंत्र्यांशी बोलणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
या प्रश्नी सध्या राष्ट्रवादी पक्षात आपण एकाकी पडलो असलो तरी पक्षावर नाराज नाही. कारण पक्षाच्या मंत्र्यांकडून मला हा प्रश्न सोडवून घ्यावयाचा आहे. यासाठी वेळ पडल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिला. गोदावरी खोऱ्यात सुरू असलेल्या बेसुमार वाळू उपशाला महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. या वाळू माफीयांकडे हत्यारे असल्याचा आरोप कोल्हे यांनी केला.
कोण विखे?
माजी खासदार बाळासाहेब विखे यांनी या पाण्याचे समान वाटप व्हावे, असे सुचविले होते. याबाबत कोल्हे यांच्याकडे विचारणा केली असता, कोण विखे? ते एका मंत्र्यांचे वडील आहेत, असे सांगत मला त्यांच्या गावाला जायचे नाही असे म्हणत विखेंच्या भूमिकेची खिल्ली उडविली. तसेच या प्रश्नी जिल्ह्यातील सर्व नेते उशीरा का होईना, मला मदत करतील असा विश्वास कोल्हे यांनी व्यक्त केला.