गोदावरी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:19 IST2021-03-21T04:19:42+5:302021-03-21T04:19:42+5:30

गोदावरी नदीपात्र-१ लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीत संपूर्ण कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी गेल्या अनेक ...

The water in Godavari river smells bad due to moss | गोदावरी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी

गोदावरी नदीतील पाणी शेवाळल्याने सुटली दुर्गंधी

गोदावरी नदीपात्र-१

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरालगत वाहणाऱ्या गोदावरी नदीत संपूर्ण कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी गेल्या अनेक वर्षापासून सोडले जात आहे. सद्य:स्थितीत नदीतील पाणी हे पूर्णतः शेवाळले असून या पाण्याची दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे कोपरगाव शहरातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊन रोगराई वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे कोपरगाव नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे.

गोदावरी नदीच्या काठावर वसलेल्या कोपरगाव शहराची लोकसंख्या सुमारे १ लाखांच्या आसपास असून घरांची संख्या अंदाजे २२ हजारांच्यावर आहे. यासर्व घरांचे मैलामिश्रित सांडपाणी तसेच शहरातील ज्या ज्या उद्योगात, व्यवसायात स्वच्छतेसाठी, प्रक्रियेसाठी पाण्याचा उपयोग करून झाल्यानंतरचे अशुद्ध पाणी नदीत सोडले जाते. त्यामध्ये हे मोहनीराजनगर, के. जे. एस. कॉलेज परिसर, जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहाच्या पाठीमागील लोकवस्ती, १०५ इंदिरानगर, दत्तनगर, गोरोबानगर, गांधीनगर, गजानन नगर, स्वामी समर्थ मंदिर परिसर, दत्तपार, सराफ बाजार येथील गटारीच्या माध्यमातून वहात जाते. त्यात आणखी उर्वरित शहरातील उपनगरांचे सर्व एकत्र होते. यानंतर ते पाणी खंदकनाल्यातून २४ तास सरळसरळ नदीपात्रात सोडले जात आहे. ज्यावेळी नदी प्रवाहित असते, त्यावेळी हे सर्व पाणी नदीच्या प्रवाहात वाहून जाते. उर्वरित आठ महिने मात्र, हे अशुद्ध पाणी नदीपात्रात साचले जाते. त्यातून नदीचे मोठे प्रदूषण तर होतेच आहे. परंतु, सद्य:स्थितीत हे पाणी नदीपात्रात साचलेले असून पूर्णतः शेवाळले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी सुटली आहे. त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून साथीचे आजार वाढण्याची चिन्हे आहेत.

...........

कोपरगाव शहराचे मैलामिश्रित सांडपाणी तसेच इतर दूषित पाणी गोदावरी नदीत न सोडता यावर प्रक्रिया करावी, यासाठी कोपरगाव नगरपरिषदेकडे वारंवार पत्रव्यवहार करून मागणी केली आहे. सद्य:स्थितीत नदीतील पाणी दूषित झाले आहे. डासांचे प्रमाण वाढले आहे. परंतु, याकडे नगरपरिषद प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे.

-आदिनाथ ढाकणे, अध्यक्ष, गोदामाई प्रतिष्ठान, कोपरगाव.

..............

कोपरगाव शहरातील सांडपाणी व्यवस्थापनासाठी नगरपरिषदेच्यावतीने १२५ कोटीं खर्चाचा सांडपाणी पुनर्प्रक्रिया प्रकल्पाचा प्रस्ताव तयार करून मागील वर्षीच शासनाकडे पाठविला आहे. त्यावर शासनस्तरावर अद्यापपर्यंत विचार झालेला नाही.

-प्रशांत सरोदे, मुख्याधिकारी, नगरपरिषद, कोपरगाव.

....

Web Title: The water in Godavari river smells bad due to moss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.