चौघा तरुणांना जलसमाधी
By Admin | Updated: April 15, 2016 23:12 IST2016-04-15T23:09:42+5:302016-04-15T23:12:28+5:30
शेवगाव/ कोपरगाव(अहमदनगर) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना

चौघा तरुणांना जलसमाधी
पोहणे बेतले जिवावर : राक्षी व सोनारी गावावर शोककळा
शेवगाव/ कोपरगाव(अहमदनगर) : दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या चौघा तरुणांना जलसमाधी मिळाल्याची दुर्दैवी घटना घडली़ पहिल्या घटनेतील मुले शेवगाव तालुक्यातील राक्षी येथील शेततळ्यात पोहण्यासाठी उतरले होते़ तर दुसऱ्या घटनेतील तरुण कोपरगाव तालुक्यातील सोनारी येथे विहिरीत पोहण्यासाठी गेले होते़ शेवगाव तालुक्यातील राक्षी येथे शुक्रवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास उन्हाळी सुट्ट्या असल्याने अक्षय रामेश्वर झुंबड, अक्षय बाळासाहेब मगर (वय १८) व विशाल प्रकाश मगर (वय १४) ही तीन शाळकरी मुले माळरानावर गुरे चारण्यासाठी गेले होते. दरम्यान, राक्षी-कुरुडगाव रस्त्यावरील रामनाथ काळे यांच्या शेततळ्यात पोहण्यासाठी हे मुले उतरले. परंतु तिघांनाही पोहता येत नसल्याने तसेच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने यातील अक्षय झुंबड व अक्षय मगर हे दोघे पाण्यात बुडाले़ तर तेथे जमलेल्या लोकांनी दोर सोडून विशाल मगर याला कसेबसे शेततळ्याबाहेर काढले. अत्यवस्थ असलेल्या विशाल यास पुढील उपचारासाठी नगर येथे हलविण्यात आले. बहिणीच्या लग्नासाठी नोकरीच्या ठिकाणाहून गावाकडे आलेल्या दोन सख्या भावांचा विहिरीत पोहोताना मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी (दि़१४) सायंकाळी कोपरगाव तालुक्यातील सोनारी गावात घडली़ विक्रांत अर्जुन शेलार (वय २४) व विशाल अर्जुन शेलार (वय २१) अशी मयतांची नावे आहेत़ विक्रांत हा सुरत येथे तर विशाल जळगाव येथे नोकरीस होता़ गुरुवारी (दि़ १४) शेतातील विहिरीत ते पोहण्यासाठी गेले़ प्रथम विक्रांतने विहिरीत उडी घेतली़ तो गटांगळ्या खात असल्याचे पाहून विशालनेही उडी घेतली़ तेव्हा विक्रांतने विशालला मिठी मारली़ त्यामुळे दुर्दैवाने दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला़ (प्रतिनिधी) ़़़़़़़़़़़़ दोघे एकुलेत एक राक्षी येथे घडलेल्या या दुर्घटनेतील मयत अक्षय झुंबड, अक्षय मगर या दोघांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती़ उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांना जीव गमवावा लागला़ हे दोघेही आई-वडिलांना एकुलते एक होते. ़़़़़़़़ बहिणीचे लग्न दोन दिवसांवर आणि काळ ओढावला विक्रांत शेलार व विशाल शेलार हे दोघे सख्खे भाऊ होते़ त्यांच्या बहिणीचे लग्न १७ एप्रिलला होते़ लग्नाच्या तयारीसाठी विक्रांत व विशाल दोघे भाऊ सोनारी येथे आले़ बहिणीचे लग्न दोन दिवसांवर असतानाच काळाने या सख्या भावांवर घाला घातला़