वांबोरी पाइप चारी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 04:41 IST2021-02-28T04:41:47+5:302021-02-28T04:41:47+5:30
तिसगाव : गर्भगिरी डोंगरपट्ट्यातील करडवाडी (ता. पाथर्डी) शिवारात वांबोरी पाइप चारीची मुख्य पाइपलाइन सोमवारी रात्री अज्ञाताने फोडली. त्यामुळे नैसर्गिक ...

वांबोरी पाइप चारी फोडली
तिसगाव : गर्भगिरी डोंगरपट्ट्यातील करडवाडी (ता. पाथर्डी) शिवारात वांबोरी पाइप चारीची मुख्य पाइपलाइन सोमवारी रात्री अज्ञाताने फोडली. त्यामुळे नैसर्गिक प्रवाहाने तिसगाव पाझर तलावात सुरू असलेला पाणीपुरवठा खंडित झाला.
पाइपलाइन फोडल्याचे घटनेप्रकरणी शाखा अभियंता अण्णासाहेब आंधळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
वांबाेरी पाइप चारीला गत सप्ताहात पाणी सुरू झाले. चार दिवसांतच ते शिरापूरच्या अंतिम भागात पोहोचले. त्यामुळे मार्च आरंभाला लाभधारक शेतकऱ्यांना हायसे वाटले होते. श्री क्षेत्र मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड यांनी मंत्री शंकरराव गडाख यांना भेटून पाणी मागणीचे निवेदन दिले. मढीच्या अंतिम भागात एकदा तरी पाणी यावे, असा आग्रह धरला. त्यामुळे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी ‘टेल टू हेड’ असे आवर्तन यशस्वी करण्यासाठी पावले उचलली होती. सोमवारी मध्यरात्री मात्र अज्ञात व्यक्तीने करडवाडी शिवारात पाइपलाइन फोडली. त्यामुळे पुन्हा व्यत्यय आला आहे. कालवा निरीक्षक पांडुरंग आरगडे, बाळासाहेब थोरात यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस संशयितांचा शोध घेत आहेत.