प्रतीक्षा ‘प्रसन्ना’च्या प्रतिसादाची!
By Admin | Updated: June 23, 2014 00:08 IST2014-06-22T23:27:18+5:302014-06-23T00:08:35+5:30
शहर बस सेवेचा तिढा : आधी चर्चा, नंतरच महासभेत विषय

प्रतीक्षा ‘प्रसन्ना’च्या प्रतिसादाची!
अहमदनगर : आर्थिक नुकसान होत असल्याच्या कारणावरून बंद असलेली शहर बस सेवा सुरू करण्याबाबत महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी यांना आता प्रसन्नाच्या प्रतिसादाची प्रतीक्षा लागली आहे. प्रसन्नाच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा झाली तरच करारामधील अटी शिथिल करून त्यांना नुकसान भरपाईबाबत विचार करण्याचा पवित्रा पदाधिकाऱ्यांनी घेतला आहे. बस सेवा सुरू होण्याबाबत दोन्ही बाजुंनी कोणतीही हालचाल झाली नसल्याने बस सेवेचा तिढा सुटण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत.
प्रसन्ना पर्पल यांनी स्थायी समितीला दिलेला दरवाढीचा प्रस्ताव फेटाळल्याने शहर बस सेवा बंद करण्याचा निर्णय प्रसन्नाच्या व्यवस्थापनाने घेतला होता. त्यानंतर शहरामधील बस सेवा बंद झाली आहे. अचानकपणे बस सेवा बंद केल्याने महापालिकेने प्रसन्नाला नोटीस बजावली होती. प्रसन्नाच्या कार्यालयाला शनिवारी दुपारनंतर तसेच रविवारी सुटी असल्याने त्यांना नोटीस मिळाली नव्हती. सोमवारी कार्यालय उघडल्यानंतर नोटीस प्राप्त झाली तरच त्यामध्ये नेमके काय आहे, हे पाहून पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्रसन्नाच्या व्यवस्थापनाने सांगितले. दुसरीकडे प्रशासन आणि पदाधिकारी पातळीवरही कोणतीही चर्चा झाली नसल्याने शहर बस सेवेचा तिढा आणखीनच गुंतागुंतीचा झाला आहे. (प्रतिनिधी)
प्रसन्नाच्या व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा होणे आवश्यक आहे. ते सेवा चालवायला तयार असतील तरच त्यांच्या दरवाढीचा विषय महासभेत घेता येऊ शकेल. महासभा होणारच आहे. मात्र त्यांचा विषय महासभेत घ्यायचा की नाही, हे प्रसन्नाच्या सकारात्मक चर्चेवर अवलंबून आहे. मात्र शहर बस सेवा सुरू करण्याबाबत निश्चित मार्ग काढण्याचे आमचे प्रयत्न सुरू आहेत.
-संग्राम जगताप, महापौर
प्रसन्ना आणि महापालिका यांच्यात झालेल्या कराराचा भंग करून वाढीव पैसे देणे शक्य नव्हते. म्हणून त्यांची मागणी फेटाळली. त्यांच्या मागणीप्रमाणे निर्णय घ्यायचे असतील तर करारात बदल करावा लागेल. त्यासाठी महासभेत निर्णय होणे आवश्यक आहे. महासभेत निर्णय झाला तरच तिढा सुटेल.
-किशोर डागवाले, सभापती
महापालिकेने पाठविलेली नोटीस अद्याप मिळालेली नाही. शनिवारी, रविवारी कार्यालयाला सुटी होती. सोमवारी नोटीस मिळाल्यास ती पाहूनच पुढील पाऊल टाकता येईल. आताच काही सांगता येणार नाही.
-दीपक मगर,
व्यवस्थापक, प्रसन्ना