१०८ रुग्णवाहिकांसाठी वेटिंग, दररोज ३०० पेक्षा अधिक कॉल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:18 IST2021-04-19T04:18:47+5:302021-04-19T04:18:47+5:30
श्रीरामपूर : जिल्ह्यात कोरोना व बिगर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी १०८ क्रमांकाच्या केवळ ४० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी दररोज ...

१०८ रुग्णवाहिकांसाठी वेटिंग, दररोज ३०० पेक्षा अधिक कॉल्स
श्रीरामपूर : जिल्ह्यात कोरोना व बिगर कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी १०८ क्रमांकाच्या केवळ ४० रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. मात्र त्यासाठी दररोज ३०० फोन कॉल्स येत आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेसाठीही प्रतीक्षा करण्याची वेळ रुग्णांवर आली आहे.
रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करता यावे म्हणून राज्य सरकारने भारत विकास ग्रुपच्या (बीव्हीजी) मदतीने या रुग्णवाहिका सुरू केल्या. या रुग्णवाहिकांमध्ये सर्व वैद्यकीय उपकरणे व डॉक्टरांची यंत्रणा सज्ज असते. टोल फ्री १०८ क्रमांकावर रुग्णवाहिका अपघातस्थळी दाखल होतात.
जिल्ह्यात एकूण ४० रुग्णवाहिका सध्या सेवा बजावत आहेत. मात्र, जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार पाहता ही संख्या फारच अपुरी आहे. त्यामुळे आणखी रुग्णवाहिकांची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रुग्णवाहिकांसाठी सध्या दररोज ३०० पेक्षा अधिक फोन कॉल्स येत आहेत. यातील बहुतेक रुग्णांना वाहने उपलब्ध होतात. मात्र, त्याकरिता प्रतीक्षा करावी लागते. सर्वांनाच वेळेवर सेवा मिळणे शक्य नाही, असे नगर येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
------------
बेड्ससाठी होते शोधाशोध
कोरोना रुग्णांना सहजासहजी बेड्स उपलब्ध होत नाहीत. अनेक रुग्णालयांमध्ये त्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका अडकून पडते. रुग्णांच्या कुटुंबीयांनी बेड्सची उपलब्धता पाहूनच कॉल करावे, अशी सूचना सध्या दिली जात आहे.
-----------
खासगी सेवेशिवाय नाही पर्याय
सरकारी सेवेतील मोफत रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे नाईलाजाने रुग्णांना खासगी सेवेचा आधार घ्यावा लागतो. तिथे मात्र जादा पैसे मोजावे लागत आहेत.
--------------
ग्रामीण भागाची उपेक्षा
ग्रामीण भागामध्ये १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका वेळेवर मिळत नाहीत. शहरी भागामध्ये तुलनेत त्या वेळेवर दाखल होतात अशी सध्या स्थिती आहे.
---------
कोरोनासाठी १५ रुग्णवाहिका
कोरोनाच्या रुग्णांसाठी ४० मधील १५ रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. इतर वाहने मात्र अपघातग्रस्त व इतर आजारासाठी राखीव ठेवल्याची माहिती बीव्हीजीकडून देण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गरज लक्षात घेऊन खासगीमधील अतिरिक्त रुग्णवाहिकादेखील भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या होत्या. दुसऱ्या लाटेत मात्र अद्याप ही कारवाई करण्यात आलेली नाही.
------------