मजुरी रखडविल्यास पगारातून वसुली
By Admin | Updated: July 4, 2014 01:21 IST2014-07-04T01:17:27+5:302014-07-04T01:21:47+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाअभावी पाणी टंचाईची परिस्थिती आहे. यामुळे महसूल, जिल्हा परिषद यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे.

मजुरी रखडविल्यास पगारातून वसुली
अहमदनगर : जिल्ह्यात पावसाअभावी पाणी टंचाईची परिस्थिती आहे. यामुळे महसूल, जिल्हा परिषद यांच्यासह जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी दक्ष राहावे. रोहयोची मजुरी वेळेत मजुरांना न देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पगारातून वसूल करण्याचा इशारा विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवनात आयोजित बैठकीत आयुक्त डवले बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल कवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल, अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
डवले यांनी सुरुवातीला तालुकानिहाय पाणी टंचाईचा आढावा घेतला. पावसाअभावी गंभीर परिस्थिती असल्याने शासन पातळीवर गंभीर पावले उचलण्यात येत आहेत. गटविकास अधिकारी, तहसीलदार, नगरपालिकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जनतेला पाणी टंचाईची झळ पोहोचणार नाही, यासाठी समन्वय ठेवण्याच्या सूचना केल्या. बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा करून निर्णय घ्यावा. पाणी वापराबद्दल जगजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत मागेल त्याला काम देण्यात यावे, यासाठी पुरेशा प्रमाणात कामे मंजूर करून ठेवावीत. कोणत्याही परिस्थितीत कामांचे मस्टर १५ दिवसांपेक्षा अधिक काळ प्रलंबित राहणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. विहित मुदतीत मजुरांची मजुरी देण्यात आली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसुली करण्याचा इशारा त्यांनी दिला.
धरणस्थिती
जिल्हाधिकारी कवडे यांनी जिल्ह्यात भंडारदरा धरणात ७८२, मुळा प्रकल्पात ५०६६ , निळवंडे प्रकल्पात ३७८ दशलक्ष घनफूट पाणी साठा असल्याचे सांगितले. २४२ गावे आणि १ हजार ११५ वाड्यांवर ३०६ टँकरव्दारे पाणी पुरवठा सुरू असून आॅक्टोबर महिन्यापर्यंत पुरेल एवढा चारा आहे. रोहयोची ७३९ कामे सुरू असून ३४ हजार मजुरांची उपस्थिती असल्याचे सांगीतले.