वडगाव तांदळीत मद्यसाठा जप्त
By Admin | Updated: September 23, 2014 23:02 IST2014-09-23T22:56:27+5:302014-09-23T23:02:21+5:30
अहमदनगर: तालुक्यातील वडगाव तांदळी परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना ३६ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला.

वडगाव तांदळीत मद्यसाठा जप्त
अहमदनगर: तालुक्यातील वडगाव तांदळी परिसरात हॉटेलमध्ये विनापरवाना ३६ हजार रुपये किमतीचा मद्यसाठा आढळून आला. या हॉटेलवर नगर तालुका पोलिसांनी छापा घातला. या प्रकरणी हॉटेलमालकावर बेकायदा दारु विक्री प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील वाळकी ते राळेगण म्हसोबा या रोडवरील हॉटेल दिनामध्ये बेकायदा मद्यसाठा असल्याची माहिती पोलीस अधीक्षक लखमी गौतम, पोलीस उपअधीक्षक महेरे (ग्रामीण) यांना मिळाली होती. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी एक पथक तयार करून मंगळवारी हॉटेलवर छापा घातला. दिना हॉटेलकडे हॉटेल चालविण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. या हॉटेलची झडती घेतली असता हॉटेलमध्ये ३६ हजार रुपये किमतीची देशी-विदेशी दारू आणि बिअरच्या बाटल्यांचा साठा आढळून आला. अवैध दारु बाळगणे, त्याची विक्री करणे आणि त्यासाठी साठा केल्यामुळे पोलिसांनी मद्यसाठा जप्त केला. हॉटेल चालविण्याचा परवानाही हॉटेल मालकाकडे नव्हता. या दोन्ही प्रकरणी हॉटेल मालक मंगेश दिनकर रणसिंग (वय २५, रा. वडगाव तांदळी, ता. नगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल आनंद सत्रे, पोलीस नाईक औटी, गायकवाड यांच्या पथकाने ही कारवाई केली.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल आनंद भगवान सत्रे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल एम.ए. थोरात करीत आहेत. (प्रतिनिधी)