शेंडी-पोखर्डीच्या गौराईच्या लढाईत यंदाही खंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:25 IST2021-09-07T04:25:55+5:302021-09-07T04:25:55+5:30
केडगाव : श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नगर तालुक्यातील शेंडी व पोखर्डी या दोन गावांदरम्यान होणाऱ्या गौराईच्या लढाईवर यंदाही कोरोनाचे ...

शेंडी-पोखर्डीच्या गौराईच्या लढाईत यंदाही खंड
केडगाव : श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी नगर तालुक्यातील शेंडी व पोखर्डी या दोन गावांदरम्यान होणाऱ्या गौराईच्या लढाईवर यंदाही कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे हा सोहळा गाव पातळीवर साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय दोन्ही गावांनी घेतला आहे. यामुळे सलग दुसऱ्या वर्षी या लढाईत खंड पडणार आहे.
ऐतिहासिक परंपरा असणाऱ्या या सोहळ्यात गौराईचे पूजन करून तिचे साध्या पद्धतीने विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शेंडी व पोखर्डी ही दोन्ही आजूबाजूची गावे. सीना नदी या दोन गावांची सीमारेषा आहे. दोन्ही गावातील महिलांमध्ये भांडण, एकमेकींना शिव्यांची लाखोली, खेचाखेची, दोन्ही बाजूकडून ओढाओढी अशा प्रकारची ऐतिहासिक परंपरा असणारी ही गौराईची लढाई प्रसिद्ध आहे. ही लढाई पाहण्यासाठी दरवर्षी मोठी गर्दी होत असते. ही लढाई द्वेषाची नसते तर प्रेमाची असते. दरवर्षी श्रावणी पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ही लढाई सीना नदी पात्रात खेळली जाते. मागील वर्षीपासून कोरोनाचे संकट आल्याने या लढाईत खंड पडला. यावर्षीही लढाईवर कोरोनाचे सावट असल्याने साध्या पद्धतीने हा सोहळा साजरा करण्याचा निर्णय दोन्ही गावांनी घेतला. गौराईचे पूजन करून तिचे विधीवत विसर्जन करण्यात येणार आहे.
----
मागील वर्षाप्रमाणे यंदाही कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे दोन्ही गावांनी हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.
-रामेश्वर निमसे,
सरपंच, पोखर्डी
---
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे कोरोनाचे सारे नियम पाळून दोन्ही गावातील काही महिला गौराईचे पूजन करणार आहेत.
- गोरक्षनाथ ढवळे,
माजी सरपंच, पोखर्डी