श्वानांसाठी मोडला ‘विठ्ठल’चा संसार!
By Admin | Updated: July 24, 2016 23:58 IST2016-07-24T23:30:12+5:302016-07-24T23:58:41+5:30
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा ग्रामीण संस्कृतीत मानाचे पान लाभलेल्या पशुंवरील प्रेम एकीकडे लोप पावत असतानाच मढेवडगाव येथील विठ्ठल पांडुरंग साळवे हा पशुप्रेमी श्रीगोंदा तालुक्यात चर्चिला जात आहे़

श्वानांसाठी मोडला ‘विठ्ठल’चा संसार!
बाळासाहेब काकडे, श्रीगोंदा
ग्रामीण संस्कृतीत मानाचे पान लाभलेल्या पशुंवरील प्रेम एकीकडे लोप पावत असतानाच मढेवडगाव येथील विठ्ठल पांडुरंग साळवे हा पशुप्रेमी श्रीगोंदा तालुक्यात चर्चिला जात आहे़ या विठ्ठलाचा संसार मोडला तरी त्याने आपले श्वानप्रेम कमी होऊ दिले नाही म्हणूनच तीन श्वान या विठ्ठलाचे जीवनसाथी बनले आहेत़
विठ्ठल साळवे याला पत्नी व दोन मुले आहेत़ आठवडे बाजारात भाजीपाला विकून तो उदरनिर्वाह चालवितो़ विठ्ठलला लहानपणापासून श्वानांची आवड होती़ या श्वानप्रेमात तो माणसांना विसरुन जायचा़ विठ्ठलला रस्त्यावर एक कुत्र्याचे पिल्लू सापडले़ विठ्ठलने त्याला घरी आणले, त्याचे संगोपन केले़ या श्वानाला त्याने ‘भाई’ हे नाव ठेवले़ पुढे त्याला ‘राजू’ व ‘दादा’ नावाचे दोन साथीदार आणले़ मात्र, विठ्ठलला पत्नीचे वितुष्ट ओढावून घ्यावे लागले़ पत्नी मुलांसह माहेरी निघून गेली़ आता घरात विठ्ठल आणि त्याचे तीन साथीदार श्वान राहत आहेत़
संसार मोडला तरी विठ्ठल कुत्र्यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे जीव लावत आहे़
विठ्ठल त्यांना दररोज गरम पाण्याने आंघोळ घालतो़ त्यांच्यासाठी पोळी, भाकरी करतो़ श्वानांना खाऊ घातल्याशिवाय तोही जेवत नाही़ विठ्ठल आठवडे बाजाराला गेल्यानंतर हे श्वान घराची राखण करतात़ घरी आल्यानंतर विठ्ठल या श्वानांना घेऊन गावातून फेरफटका मारतो़ रात्रीच्या वेळी विठ्ठल घरात झोपल्यानंतर हे श्वान आपल्या घरधन्याचे संरक्षण करतात़ त्यामुळे विठ्ठल निश्चिंत झोप घेतो़
जीव लावला की पशु माणसांपेक्षा जादा साथ देतात़ मी कधी आजारी पडलो तर माझा ‘भाई’ माझ्याजवळ बसून राहतो़ धकाधकीच्या जीवनात स्वत:ची मुलंही जवळ बसू शकत नाहीत़ हे प्रेम श्वान देऊ शकतात, यातच खरे सुख आहे़ हे तीन श्वानच माझे जीवनसाथी आहेत़
-विठ्ठल साळवे.