विसापूर तलाव ओव्हरफ्लो

By Admin | Updated: October 4, 2016 00:45 IST2016-10-04T00:18:04+5:302016-10-04T00:45:21+5:30

श्रीगोंदा/काष्टी/आढळगाव/पारनेर: श्रीगोंदा व पारनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने हंगा नदीला पूर आला आहे़ त्यामुळे विसापूर तलावातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे़

Visapur Lake Overflow | विसापूर तलाव ओव्हरफ्लो

विसापूर तलाव ओव्हरफ्लो


श्रीगोंदा/काष्टी/आढळगाव/पारनेर: श्रीगोंदा व पारनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने हंगा नदीला पूर आला आहे़ त्यामुळे विसापूर तलावातील पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे़ त्यामुळे विसापूर तलाव काही तासातच ओव्हरफ्लो होणार आहे़ सोमवारी सकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली़ त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशीही अनेक पुलांवरुन पुराचे पाणी वाहत होते़ त्यामुळे बहुतांश भागातील वाहतूक बंद होती़ सरस्वती, पळसा व देव या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत़ पारनेर तालुक्यातील वडझिरे येथील पूलही पाण्याखाली गेल्यामुळे पारनेर-अळकुटी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती़
गणेश उत्सवापासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे़ नवरात्रौत्सवाच्या प्रारंभाला पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली़ सोमवारी तिसऱ्या दिवशीही जोरदार पाऊस झाला़ सकाळपासूनच पाऊस सुरु होता. श्रीगोंदा ते आढळगाव, श्रीगोंदा ते पारगाव, श्रीगोंदा ते मांडवगण रस्त्यावरील पुलांवरुन पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद होती. दुपारनंतर पावसाने उघडीप दिली. सायंकाळपर्यंत बहुतांश रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद होती.
काही ठिकाणच्या तलावातून पाण्याची गळती होत असल्याची माहिती समजताच तहसीलदार वंदना खरमाळे, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ यांनी ढोरजा, खांडगाव, महादेववाडी (टाकळी लोणार) येथे जावून पाहणी केली. ढोरजा व खांडगाव येथील तलावातून पाण्याचा विसर्ग होण्यास अडथळा निर्माण झाला होता. जेसीबी मशीनच्या सहाय्याने हा अडथळा दूर करण्यात आला. भानगाव, ढोरजा, खांडगाव, टाकळी लोणार येथील बंधाऱ्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तहसीलदार वंदना खरमाळे म्हणाल्या की, आज काही तलावांची पाहणी केली. तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचा कुठे धोका वाटल्यास नागरिकांनी तात्काळ आपत्ती नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
दरम्यान आढळगाव भागात जोरदार पाऊस झाल्याने आढळगाव ते जमदाडे वस्तीपर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेला होता. या रस्त्याच्या बाजूला साइड गटार नसल्याने पावसाचे पाणी रस्त्यावर येते. याचा त्रास या परिसरातील नागरिकांना होतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. घायपतवाडी नजिकच्या अंबील नदीवरील पुलावरुन सुरु असलेला पूर तब्बल तीस तासांनंतर ओसरला आणि वाहतूक सुरळीत झाली.
सोमवारी दुपारी पावसाने उघडीप दिल्यानंतर पाण्याचा जोर ओसरला. जामखेड, आष्टी, कर्जतवरुन येणाऱ्या तसेच जाणाऱ्या एस़टी़बससह इतर वाहतूक रविवारी घोडेगावमार्गे वळविण्यात आली होती़ सोमवारी दुपारनंतर ही वाहतूक या मार्गावरुन सुरळीत सुरु झाली आहे. या परिसरात पावसाचा जोर वाढला की अरुंद असलेल्या ओढ्याच्या पात्रामुळे काही तासातच पूल पाण्याखाली जाऊन वाहतूक ठप्प होते़

Web Title: Visapur Lake Overflow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.