आंदोलनाला हिंसक वळण दुर्दैवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:41 IST2021-02-05T06:41:42+5:302021-02-05T06:41:42+5:30
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : दिल्लीत मंगळवारी घडलेल्या हिंचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत ...

आंदोलनाला हिंसक वळण दुर्दैवी
राळेगणसिद्धी (जि. अहमदनगर) : दिल्लीत मंगळवारी घडलेल्या हिंचाराबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिल्लीत जे घडले ते नक्कीच क्लेशदायक आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आपणच धुडगूस घालून आपल्याच मालमत्तेची हानी करावी, हे फारच दुर्दैवी आहे, अशा शब्दात अण्णा हजारे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना खंत व्यक्त केली.
दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर मोर्चाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी बॅरिकेटस् पाडून लाल किल्ल्यात प्रवेश केला. यावेळी अनेक भागांत आंदोलक आणि पोलीस आमनेसामने आले. या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे म्हणाले, प्रजासत्ताकदिनी प्रजेची सत्ता आली. प्रजा मालक झाली. मात्र, अशा पवित्र दिवशी आपणच धूडगूस घालून आपल्या मालमत्तेची हानी करावी, राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणे पूर्णपणे चुकीचे आहे. मी ४० वर्षे आंदोलन करीत आहे. आंदोलन म्हणजे सत्याग्रह. सत्याचा आग्रह हा शांततेच्या मार्गाने, अहिंसक मार्गाने करावा लागतो. हिंसेमुळे आंदोलन बदनाम होते. गालबोट लागते, असे अण्णा हजारे यांनी सांगितले.
३० जानेवारीपासून केंद्र सरकारविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत. स्वामीनाथन् आयोगाप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव द्यावा, केंद्रीय कृषिमूल्य आयोगास स्वायत्तता द्या, अशी प्रमुख मागणी अण्णा हजारे यांनी केली आहे. मात्र, मागणीवर केंद्र सरकारकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने अण्णा हजारे यांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आंदोलन जवळ आलेले असताना दिल्लीत हिंसाचार झाल्याने अण्णा हजारे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अण्णा हजारे यांच्याकडून कृषीमंत्र्यांना उत्तर पाठविले जाण्याची शक्यता आहे. अण्णा हजारे यांनी उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले असले तरी काही तोडगा निघणार का याकडेही लक्ष लागले आहे.