ग्रामस्थांनी बोअरवेलमुक्ती आणि टँकरमुक्तीचा संकल्प करावा : राहुल व्दिवेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 16:36 IST2018-05-16T16:36:27+5:302018-05-16T16:36:54+5:30
पाणी ही व्यक्तीगत नव्हे, तर सार्वजनिक संपत्ती आहे. त्यावर सर्वांचा समान हक्क आहे. जलसंपन्न व पाणीदार गावचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामस्थांनी बोअरवेल मुक्त व टँकरमुक्तीचा संकल्प करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी व्यक्त केली.

ग्रामस्थांनी बोअरवेलमुक्ती आणि टँकरमुक्तीचा संकल्प करावा : राहुल व्दिवेदी
अहमदनगर : पाणी ही व्यक्तीगत नव्हे, तर सार्वजनिक संपत्ती आहे. त्यावर सर्वांचा समान हक्क आहे. जलसंपन्न व पाणीदार गावचे स्वप्न साकारण्यासाठी ग्रामस्थांनी बोअरवेल मुक्त व टँकरमुक्तीचा संकल्प करावा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांनी व्यक्त केली.
पाणी फाऊंडेशन आयोजित वॉटर कप स्पर्धेतील नगर तालुक्यातील कौडगावला प्रेस क्लबच्या वतीने दर्पणकार तथा मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुण्यतिथी निमित्त रोख स्वरुपाचा निधी मदत म्हणून देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी बोलत होते. याप्रसंगी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख उपस्थित होते.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची पुण्यतिथी प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांच्या संकल्पनेतून विविध सामाजिक उपक्रमांनी दरवर्षी साजरी केली जाते. या संकल्पनेतूनच प्रेस क्लबच्या वतीने श्रमदान करुन, जलसंधारणासाठी आर्थिक मदत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. सकाळी गावात पोहचलेल्या जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, प्रशासनातील अधिकारी व पत्रकारांचे गावात हलगी, संबळच्या निनादात स्वागत करण्यात आले. लोकसहभागातून तयार केलेल्या रोपवाटिकेचे यावेळी उदघाटन झाले. गावा जवळील डोंगराळ भागात प्रशासकीय अधिकारी, पत्रकार व ग्रामस्थांनी रणरणत्या उन्हात जलसंधारणाच्या कामात श्रमदान केले. श्रमदानानंतर झालेल्या पुण्यतिथी कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मन्सूर शेख यांनी मदतीची अकरा हजार रुपयाची रोख रक्कम जिल्हाधिकारी व्दिवेदी यांच्याकडे सुपुर्द केली. यावेळी उप जिल्हाधिकारी वामन कदम, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे, आत्माचे संचालक भाऊसाहेब ब-हाटे, उपविभागीय अधिकारी उज्वला गाडेकर, कृषी उपविभागीय अधिकारी सुधाकर बो-हाळे, नायब तहसिलदार वैशाली आव्हाड, सरपंच धनंजय खर्से आदिंसह प्रशासकिय अधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.