कॅन्सरग्रस्त वृद्धेच्या मदतीसाठी ग्रामस्थांची धाव
By Admin | Updated: November 28, 2014 01:14 IST2014-11-28T00:38:34+5:302014-11-28T01:14:10+5:30
अहमदनगर : कॅन्सरग्रस्त आईला वाचविण्यासाठी मुलाची धडपड या आशयाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्रामस्थांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली असून,

कॅन्सरग्रस्त वृद्धेच्या मदतीसाठी ग्रामस्थांची धाव
अहमदनगर : कॅन्सरग्रस्त आईला वाचविण्यासाठी मुलाची धडपड या आशयाखाली लोकमतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत ग्रामस्थांनी तिच्या मदतीसाठी धाव घेतली असून, कॅन्सरग्रस्त वृद्धेवर लोणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू झाले आहेत.
कामरगाव (ता. नगर) येथील सुंदराबाई रामचंद्र लष्करे (वय ६०) या कर्करोगाने पीडित आहेत. परंतु घरची आर्थिक स्थिती हलाखीची, पतीचे हरवलेले छत्र, जिथे रोजच्या दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत तिचे उपचाराला पैसे कोठून येणार, त्यामुळे सुंदराबाई आजार अंगावर काढू लागल्या. परंतु मुलाला आईची ही स्थिती बघवत नव्हती. त्यामुळे मिळेल त्या मार्गाने मदतीसाठी मुलाचे प्रयत्न सुरू होते.
‘लोकमत’ने दि. २३ नोव्हेंबरच्या अंकात कॅन्सरग्रस्त वृद्धा व तिला वाचविण्यासाठी मुलाची सुरू असलेली धडपड यावर प्रकाश टाकत समाजाकडून मदतीचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कामरगावातीलच तुकाराम कातोरे समाजसेवा मित्रमंडळाने मदतीसाठी पुढाकार घेतला.
तुकाराम कातोरे, संदीप लष्करे, कैलास झरेकर, सुनील चौधरी, सुखदेव वेताळ, सुदाम ठोकळ, भास्कर भुजबळ, राजेंद्र पोटे, शाम जाधव, सुखदेव ढवळे आदी ग्रामस्थांनी एकत्र येत २६ हजार रूपयांची मदत या कुटुंबाला दिली.
याशिवाय बँक खात्यावर पाच हजारांची मदत जमा झाली आहे. यामुळे सुंदराबार्इंना लोणी येथील प्रवरा ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
(प्रतिनिधी)