संगमनेर तालुक्यात चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 20:05 IST2017-12-26T19:58:32+5:302017-12-26T20:05:21+5:30
अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले.

संगमनेर तालुक्यात चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी पकडले
लोकमत न्यूज नेटवर्क
बोटा : अहमदनगरमधीलसंगमनेर तालुक्यातील अकलापूर शिवारात मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने एकास मारहाण करून जखमी करणा-या चार संशयित चोरट्यांना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत पकडून घारगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. संबंधित चोरटे हे सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अकलापूर, मुंजेवाडी परिसरातील मुगदरा येथे सोमवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी भाऊसाहेब भीमाजी जाधव यांच्या घरात जाऊन त्यांना तीक्ष्ण हत्याराने हातावर मारहाण करीत घरातील पत्र्याची पेटी पळवून नेली. जाधव यांनी आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ जमा झाले. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरवात केली.
दरम्यान ग्रामस्थ पकडणार या भितीने चोरट्यांनी तेथील डोंगराचे कपारीचा आधार घेतला. मंगळवारी सकाळी या डोंगरावर चार जण संशयितपणे जात असल्याचे एकाच्या निदर्शनास आले. ही बाब ग्रामस्थांना सांगण्यात आल्यावर ग्रामस्थ डोंगराजवळ जमा झाले. त्यांनी या चारही जणांना शिताफीने पकडले. ग्रामस्थांसमोर त्यांनी भाऊसाहेब जाधव यांना मारहाण करून चोरी केल्याचे सांगितले. घारगाव पोलिसांना ही माहिती देण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप निघोट सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अन्सार इनामदार हे घटनास्थळी आले. त्यांनी चोरट्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. संतोष शिवाजी जाधव (रा. आभाळवाडी), संतोष दत्तू धांडे (श्रीगोंदा), शरद बन्सी निचीत (वडनेर बुद्रुक,ता. शिरुर), चंदर दादाभाऊ गाडे (जवळा, ता. पारनेर) अशी त्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर अनेक चोरीचे गुन्हे असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.
चोरट्यांकडे सापडली हत्यारे
अकलापूर येथे पकडलेल्या चोरट्यांकडे एअरगन, तलवार व कोयता ही हत्यारे व मिरची पूड घारगाव पोलिसांना तपासादरम्यान आढळून आले आहे. या चोरट्यांची पोलीस कसून चौकशी करीत आहेत. अनेक चोरीच्या घटना या चोरट्यांकडून उघडकीस येण्याची शक्यता आहे.