आदर्शगाव मांजरसुंब्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:15 IST2021-06-21T04:15:16+5:302021-06-21T04:15:16+5:30
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे नुकतीच पोलीस खात्यामार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली. एमआयडीसी ...

आदर्शगाव मांजरसुंब्यात ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित
पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील आदर्श गाव मांजरसुंबा येथे नुकतीच पोलीस खात्यामार्फत ग्राम सुरक्षा यंत्रणा सुरू करण्यात आली.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही योजना कार्यान्वित करण्यात आली. अध्यक्षस्थानी सरपंच मंगल कदम होत्या.
यावेळी युवराज आठरे म्हणाले, आजच्या आधुनिक युगात गुन्हेगारही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत. त्यामुळे नागरिकांनीदेखील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेमार्फत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावात सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. चोरी, दरोड्याची घटना, महिला संदर्भातील गुन्हे, लहान मुले हरविणे, वाहनचोरी, गंभीर अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला, आग आदी घटनांमध्ये वेळेवर मदत मिळण्यास उपयोग होणार आहे. यामध्ये एका टोल फ्री क्रमांकावर सर्व ग्रामस्थांना एकाचवेळी संदेश पोहोचणार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजरसुंबा या गावाने सर्वात प्रथम ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी उपसरपंच जालिंदर कदम, तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान कदम, माजी उपसरपंच पांडुरंग कदम, भाऊ कदम, कविता वाघमारे, लता वरखडे, बाजीराव वाघमारे, अर्जुन कदम, पोलीस पाटील आदिनाथ मते, ग्रामस्थ उपस्थित होते.
---
मांजरसुंबा हे गाव ऐतिहासिक पर्यटनस्थळ आहे. त्यामुळे याठिकाणी खूप पर्यटक भेट देतात. परंतु, बऱ्याचवेळा गुन्हेगारी घटना घडतात. ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. -
मंगल कदम,
सरपंच, मांजरसुंबा
---
मांजरसुंबा गावाने यापूर्वी अनेक बक्षिसे मिळविली असून ग्रामसुरक्षा यंत्रणादेखील प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात येईल. परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल.
-जालिंदर कदम,
उपसरपंच, मांजरसुंबा
---
पोलीस ठाण्याच्या हद्दीत मांजसुंबा गावाने सर्वात प्रथम ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली. या यंत्रणेमार्फत परिसरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे शक्य होईल. पोलीस खात्यालाही फार मोठी मदत होईल.
-युवराज आठरे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, एमआयडीसी