येथील यशोधन जनसंपर्क कार्यालयात कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शनिवारी (दि. १४) माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. यावेळी महसूलमंत्री थोरात बोलत होते. संगमनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे, नगरसेवक दिलीप पुंड, नितीन अभंग, शैलेश कलंत्री, गजेंद्र अभंग, सुभाष सांगळे, सुरेश झावरे, अॅड. त्रिंबक गडाख, सुभाष कुटे, तात्या कुटे आदी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, विलासराव देशमुख यांच्या बरोबर काम करण्याची अनेक वर्ष संधी मिळाली. त्यांनी कायम आपल्यावर विश्वास टाकला. राज्यात विकासाच्या विविध योजना राबविताना सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या निर्णयाला प्राधान्य देऊन सर्वांना बरोबर घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत विशेष लोकप्रिय होती. राजकारणाबरोबर कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यपद्धतीतून चाहता वर्ग निर्माण केला. प्रत्येक विषयाचे सखोल ज्ञान, भाषेवर प्रभुत्व, कलागुण संपन्न व्यक्तिमत्त्व यामुळे विलासराव देशमुख राज्याच्या राजकारणात नेहमीच अग्रभागी राहिले. राज्याचे नेतृत्व करत असताना सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध राहिले. राजकारणापलीकडे दिलखुलास व्यक्तिमत्त्व म्हणून देखील ते परिचित होते. सतत कार्यमग्न राहून आलेल्या प्रसंगांना आपल्या खास शैलीतून सामोरे त्यांची पद्धत वैशिष्ट्यपूर्ण होती.
जनतेच्या प्रश्नांसाठी धाडसाने निर्णय घेऊन त्यांची अमंलबजावणी करण्यात ते नेहमीच तत्पर असायचे. नगर जिल्ह्याबरोबरच संगमनेर तालुक्यावर त्यांनी प्रेम केले, काँग्रेस कार्यकर्त्यांना कायम प्रेरणा दिली.
----------