विखेंनी नगर-नाशिक-मराठवाडा वाद पेटविला- दादा भुसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 20:04 IST2018-02-15T20:03:45+5:302018-02-15T20:04:16+5:30
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला.

विखेंनी नगर-नाशिक-मराठवाडा वाद पेटविला- दादा भुसे
कोपरगाव : विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे मुख्यमंत्र्यांचे चांगले मित्र आहेत. पण, ते भाजपवर कमी व शिवसेनेवरच जास्त टीका करतात. जिल्ह्यातील पाण्यासंदर्भात त्यांनी अहमदनगर-नाशिक-मराठवाडा असा वाद पेटविला. आमच्यावर टीका करण्यात शक्ती वाया घालविण्याऐवजी पश्चिमेस वाहून जाणारे पाणी अडवून जिल्हा सुजलाम सुफलाम करावा, असा टोला ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी गुरूवारी येथे विखेंना लगावला.
भोजडे येथे शिवसेनेच्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार सदाशिव लोखंडे होते. संपर्कप्रमुख दिलीप नाईक, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख नाना बावके, नाशिकचे उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जिल्हा संघटक विजय काळे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे आदी उपस्थित होते.
भुसे म्हणाले, अहमदनगर हा सहकार व साखर सम्राटांचा जिल्हा असताना या भागातील शेतक-यांचा म्हणावा तसा विकास झाला नाही. जून २०१७ अखेरपर्यंतच्या कर्जदार शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला पाहिजे. नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना २५ हजारांची तुटपुंजी कर्जमाफी वाढवून देण्याची आमची भूमिका आहे. केवळ घोषणा करून चालणार नाही, तर अंमलबजावणी झाली पाहिजे. सेनेला संपवायला निघालेले नारायण राणे व छगन भुजबळांची अवस्था काय झाली? हे उभा महाराष्ट्र बघत आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीला लागावे, असे सांगत एक वर्ष पक्षासाठी द्या, सरकार भगव्याचे असेल, असे भुसे यांनी सांगितले.
भोजडे ग्रामपंचायत इमारतीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती योजनेतून ११ लाख २० हजारांचा निधी देण्याची घोषणा त्यांनी केली. लोखंडे यांनी २००५ चा समन्यायी पाणी वाटप कायदा रद्द करून आपल्या हक्काचे पाणी आपल्याच भागात जिरवा, असे आवाहन करीत पश्चिमेकडून समुद्रात वाहून जाणारे ४ दशलक्ष घनफूट पावसाचे पाणी अडवून कोरडवाहू शेतक-यांना देण्यासाठी ४ कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारला दिल्याचे सांगितले. तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. अशोक कानडे यांनी सूत्रसंचालन केले. रावसाहेब थोरात यांनी आभार मानले.